Facebook, Instagram डाऊनचा झुकरबर्गंना फटका, क्षणात उडाले ३ अब्ज डॉलर | पुढारी

Facebook, Instagram डाऊनचा झुकरबर्गंना फटका, क्षणात उडाले ३ अब्ज डॉलर

पुढारी ऑनलाईन : ‘मेटा’चा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) तासभर बंद राहिले होते. यामुळे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांचे एका दिवसात सुमारे ३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यामुळे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकावर, झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती एका दिवसात २.७९ अब्ज डॉलर कमी होऊन ती १७६ अब्ज डॉलर झाली. पण त्यांचे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचे स्थान कायम आहे.

जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम तासभर बंद राहिल्याने मेटाचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. ज्यामुळे मार्क झुकेरबर्ग यांच्या निव्वळ संपत्तीत घसरण झाली. अमेरिकेतील शेअर बाजारात मेटाचे शेअर्स ४९०.२२ डॉलरवर बंद झाले.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्सच्या यूजर्संना मंगळवारी रात्री या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात अडचणी आल्या होत्या. याव्यतिरिक्त मेटा क्वेस्ट यूजर्संना त्यांच्या हेडसेटमध्ये लॉग इन करताना समस्या आल्या. अनेक YouTube यूजर्संनी प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्रुटी आल्याचेदेखील नोंदवले.

या आउटेज दरम्यान, यूजर्संनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवर “failure to load” एरर पेजीस आढळल्याची नोंद केली. काही इंस्टाग्राम यूजर्संनी नोंदवले की एरर असूनही ते अद्याप जुन्या स्टोरीज पाहू शकतात. दरम्यान, या बंद दरम्यान अनेक फेसबुक अकाऊंटस् आपोआपच अचानक लॉग आउट झाली होती.

मेटा डाऊन, एलन मस्क यांनी उडवली खिल्ली

फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यूजर्संच्या तक्रारींचा पाऊस पडला. या बंद दरम्यान X चे मालक एलन मस्क यांनीदेखील प्रतिस्पर्धी मेटाची खिल्ली उडवली. “जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल, तर आमचे सर्व्हर काम करत आहेत,” असे मस्क यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा ;

 

Back to top button