Underwater Metro In Kolkata : भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो मार्गाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

Underwater Metro In Kolkata : भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो मार्गाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९८४ मध्ये भारतातील पहिली मेट्रो सुरू झालेल्या कोलकाता येथे भारतातील पहिल्या-वहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वेचे (Underwater Metro In Kolkata) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.६) केले. हा पायाभूत सुविधांच्या विकासाकडे देशाची वाटचाल दर्शवणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी सहा नवीन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. उद्घाटनानंतर त्यांनी पाण्याखालील मेट्रो रेल्वेतून विद्यार्थ्यांसोबत प्रवासही केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे १५ हजार ४०० कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याअंतर्गत कोलकात्याच्या हावडा मैदान ते एस्प्लानेड दरम्यानच्या पाण्याखालील मेट्रो ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यामुळे भारतातील नदीखालचा पहिला बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

पाण्याखालील हा मेट्रो मार्ग हुगळी नदीखाली बांधण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सॉल्ट लेक सेक्टर व्ही आणि सॉल्ट लेक स्टेडियमला ​​जोडणाऱ्या कोलकाता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. १६.६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग हुगळीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक सिटीला जोडतो. यातील १०.८ किमी भाग भूमिगत आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच वाहतूक प्रकल्प आहे. ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे. (Underwater Metro In Kolkata)

‘या’ मेट्रो सेवांना हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कवी सुभाष मेट्रो, माजेरहाट मेट्रो, कोची मेट्रो, आग्रा मेट्रो, मेरठ-आरआरटीएस विभाग, पुणे मेट्रो आणि एस्प्लेनेड मेट्रो या मेट्रो रेल्वे सेवांना कोलकाता येथून हिरवा झेंडा दाखवला.

‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

  • हावडा मैदान आणि एस्प्लेनेड दरम्यानच्या बोगद्याची एकूण लांबी ४.८ किलोमीटर आहे.
  • १.२ किमीचा बोगदा हुगळी नदीच्या ३० मीटर खाली आहे, तो नदीखालील देशातील पहिला वाहतूक बोगदा आहे.
  • याशिवाय हुगळी नदीखाली स्थापन झालेले हावडा मेट्रो स्टेशन हे देशातील सर्वात खोल स्टेशन आहे.
  • हा बोगदा पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.

हेही वाचा : 

Back to top button