भारताशी पंगा, कॅनडाला झटका | पुढारी

भारताशी पंगा, कॅनडाला झटका

विनिता शाह, राजकीय अभ्यासक

भारत आणि कॅनडा द्विपक्षीय संबंधांमध्ये गतवर्षी मोठा तणाव निर्माण झाला असून, अद्यापही हे संबंध पूर्ववत झालेले नाहीत. या तणावाचा आर्थिक फटका कॅनडाला बसला असल्याचे अलीकडेच समोर आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचा ओघ गेल्या काही वर्षांत वाढला होता; परंतु गतवर्षीच्या तणावानंतर ही संख्या रोडावत गेल्याचे दिसले आहे.

गेल्या वर्षी वाद झाल्यानंतर कॅनडात शिक्षणासाठी जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घसरण झाली आहे. कॅनडाने गेल्यावर्षी भारतीय विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात अभ्यासव्हिसा जारी केला. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये चौथ्या तिमाहीत 86 टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थ्यांना व्हिसा जारी करण्यात आला. एकीकडे, 2022 च्या चौथ्या तिमाहीत 108, 940 व्हिसा जारी केलेले असताना 2023 मध्ये या कालावधीत केवळ 14,910 व्हिसा जारी केले गेले. वास्तविक, निज्जर प्रकरणानंतर भारताने कॅनडाच्या अनेक राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली. यात व्हिसा जारी करणार्‍या अधिकार्‍यांचाही समावेश होता. कॅनडातील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि कॅनडातील संबंध ताणल्यानंतर खूपच कमी प्रमाणात विद्यार्थिव्हिसा जारी केले गेले.

कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी एका मुलाखतीत म्हटले, येत्या काही काळात उभयदेशातील संबंध सुधारत, असे वाटत नाही. त्यांच्या मते, संबंधातील तणावाचा परिणाम हा आगामी काळात विद्यार्थ्यांच्या संख्येवरही पडू शकतो. भारतातून येणार्‍या अर्जांच्या छाननीचे प्रमाण हे निम्म्याने घटले आहे. उभय देशात कूटनीती पातळीवरचे तणाव निर्माण होण्यामागे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो जबाबदार आहेत. संसदेत बोलताना त्यांनी, कॅनडाचा नागरिक आणि खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. पण आतापर्यंत या दाव्याला दुजोरा देणारा एकही पुरावा कॅनडाकडून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यांत निज्जरची कॅनडातील एका गुरुद्वाराच्या वाहनतळात दोन अज्ञात तरुणांनी गोळी घालून हत्या केली. कॅनडाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने निज्जर हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. निज्जर हा शीख गुरुद्वारासाहिबचा प्रमुख होता आणि तो कॅनडातील खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ)चा प्रमुख होता. निज्जर हा भारतात मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक. त्यासाठी भारताने दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर उभय देशातील संबंध ताणले गेले. त्यानंतर दोन्ही देशांनी एक एक राजनैतिक अधिकारी माघारी बोलावण्यास सांगितले. त्यानंतर भारताने कॅनडातून आपले 40 अधिकारी परत बोलावले. भारतातून 41 अधिकार्‍यांना कॅनडात रवाना करण्यात आले. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या कार्यवाहीबाबत भारतावरच खापर फोडले. भारताने हा निर्णय व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करत घेतल्याचा आरोप केला. त्यास प्रत्युत्तर देताना भारताने कॅनडाचे दावे अमान्य केले आणि आंतराष्ट्रीय निकषाचे उल्लंघन केलेले नसल्याचे म्हटले.

कॅनडातील शिक्षण संस्थेत राहणे आणि अभ्यासासाठी उपलब्ध करून देणार्‍या सुविधा कमी झाल्याने भारतीय विद्यार्थी अन्य पर्यायांवर विचार करत आहेत. अलीकडच्या काळात कॅनडाला शिक्षणासाठी जाणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत सर्वाधिक संख्या भारताची राहिली आहे. 2022 मध्ये कॅनडाकडून जारी केलेल्या एकूण विद्यार्थी व्हिसापैकी 2 लाख 25 हजार 835 व्हिसा म्हणजेच सुमारे 41 टक्के व्हिसा भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आले. हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कॅनडातील विद्यापीठासाठी उत्पन्नाचे मोठे साधन होते. ते देशासाठी वार्षिक सुमारे 1614 अब्ज डॉलरचे योगदान देतात आणि आता त्यात घट झाल्याने कॅनडाला मोठा आर्थिक झटका बसला.

Back to top button