

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशासह जगभरात अयोध्या राम मंदीर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची जाेरदार तयारी सुरू आहे. आजपासून उ.प्रदेशातील अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. दरम्यान रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जगभरातील रामभक्तांना 'या' सोहळ्याबद्दलचे मत व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भातील माहिती ट्रस्टने त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून दिली आहे. (Shri ram janmbhoomi)
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने म्हटले आहे की, प्रभू श्रीराम पाच शतकांनंतर आपल्या जन्मभूमीत परतत आहेत. संपूर्ण विश्व या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. प्रभू श्री रामाच्या स्वागताची भव्यता वाढवण्यासाठी, आम्ही जगभरातील सर्व राम भक्तांना या ऐतिहासिक घटनेबद्दल त्यांचे विचार आणि भावना एका छोट्या व्हिडिओद्वारे व्यक्त करण्याचे आवाहन करतो, असे ट्रस्टने म्हटले आहे.(Shri ram janmbhoomi)
रामल्ला प्राणप्रतिष्ठा समारंभ संदर्भातील मत आणि विचारावर बनवलेला व्हिडिओ रामभक्तांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करावा. यामध्ये #ShriRamHomecoming असा टॅग लिहून यासोबत तुमचे पूर्ण नाव, स्थान आणि एक लहान वैयक्तिक नोट लिहून पोस्ट करू शकता, असे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. तसेच आपण सर्वांनी एकत्र येऊन एकत्रितपणे एकतेचे महान शिल्पकार प्रभू श्री राम यांचे आगमन साजरे करूया, असेही ट्रस्टने म्हटले आहे. (Shri ram janmbhoomi)