चीनमध्‍ये वाढलाय ‘Virtual Pregnancy’चा ट्रेंड, काय आहे यामागील कारण ? | पुढारी

चीनमध्‍ये वाढलाय 'Virtual Pregnancy'चा ट्रेंड, काय आहे यामागील कारण ?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तंत्रज्ञान नेहमीच मानवी जगण्‍यात आमुलाग्र बदल करते. इंटरनेटमुळे मागील दाेन दशकांमध्‍ये मानवी जीवनाचा चेहरा-माेहराच बदलला आहे. त्‍याचे फायदे-तोटे जसे व्‍यक्‍तिगत आहेत तसेच त्‍यामुळे निर्माण झालेल्‍या सामजिक समस्‍याही तेवढ्याच आव्‍हानात्‍मक आहेत. कोरोना काळात आपल्‍याकडे सर्वसामन्‍यांच्‍या परिचय झालेला ‘व्हर्च्युअल’ हा शब्‍द सध्‍या चीनमध्‍ये वेगळ्याच कारणामुळे सध्‍या ट्रेंडमध्‍ये आहे. काही महिन्‍यांपूर्वी जगातील सर्वाधिक लोकसंख्‍येचा देश, असे बिरुद मिरवणार्‍या चीनमधील तरुणाईमध्‍ये सध्‍या ‘व्हर्चुअल प्रेग्नंसी’चा (आभासी गर्भधारणा) ट्रेंड वाढला. खऱ्या मुलाला जन्‍म देण्‍यापेक्षा ‘ई-प्रेग्नन्सी’ किंवा ‘व्हर्च्युअल प्रेग्नन्सी’ला नवविवाहित जोडपी प्राधान्‍य देताना दिसत आहेत. व्हर्चुअल प्रेग्नंसी’ हा शब्द चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर ट्रेंड होत आहे. त्यामुळे देशातील काही लोकांना मानवी सभ्यतेच्या भवितव्याबद्दलही चिंता वाटत आहे. जाणून घेवूया नेमकं सध्‍या चीनमध्‍ये ट्रेंडमध्‍ये असणार्‍या ‘व्हर्चुअल प्रेग्नंसी’ ( Virtual Pregnancy ) या विषयी…

‘व्हर्चुअल प्रेग्नंसी’ म्‍हणजे काय?

व्हर्चुअल प्रेग्नंसी (आभासी गर्भधारणा) म्‍हणजे प्रत्‍यक्षात गर्भधारणा होण्याऐवजी त्‍याची सोशल मीडियावर घोषणा करणे आणि सर्वकाही प्रत्यक्षात घडत असल्यासारखे वागणे. व्हर्चुअल प्रेग्नंसीमध्‍ये स्त्रिया संपूर्ण 9 महिने गर्भवती महिलेप्रमाणे जगतात. या काळात अनेक त्‍या गर्भवती महिला पालन करते त्‍या सर्व चिनी प्रथा त्‍या पाळतात. त्याचे अभिनंदन करण्यासाठी लोकही येतात. मूल किंवा गर्भधारणा वगळता व्हर्चुअल प्रेग्नंसीमध्‍ये सर्व काही वास्तविक ठेवले जाते.

‘Virtual Pregnancy ‘ला प्राधान्य का?

चिनी तरुणांमध्ये आभासी गर्भधारणेचा कल वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. नवविवाहित जोडपी त्यांच्या व्यस्त जीवनामुळे आणि धावपळीच्‍या जीवनशैलीमुळे मुले जन्माला घालण्याच्या मानसिकतेमध्‍ये नाहीत. अशा परिस्थितीत ते व्हर्चुअल प्रेग्नंसीचा अवलंब करतात. जगण्‍यात एक भावनिक आधार असावा म्‍हणून ते या मार्गाचा अवलंब करतात.  व्हर्च्युअल मुलाचे नाव देखील ठेवले जाते. तर दुसरे कारण म्‍हणजे चिनी तरुण पैसे वाचवण्यासाठी याचा अवलंब करत आहेत, असे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने आपल्‍या वृत्तात म्‍हटले आहे.

जोडपी व्हर्चुअल प्रेग्नंसीची  कल्‍पना करुन होऊन भविष्यासाठी पैसे वाचवतात. ‘व्हर्च्युअल प्रेग्नन्सी’ दरम्यान जोडपे गर्भधारणा निधी तयार करतात. आम्ही वैद्यकीय चाचण्यांपासून ते आरोग्य पूरक आहार आणि आरोग्यदायी अन्नापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी रक्कम बाजूला ठेवतो. फरक एवढाच आहे की या वस्तू प्रत्यक्षात खरेदी करण्याऐवजी ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. एखाद्या जोडप्याने त्यांच्या व्हर्चुअल प्रेग्नंसीचीच्या पहिल्या महिन्यात 5,000 रुपये चाचण्यांवर आणि 3,000 रुपये औषधांवर खर्च केले तर ते हे पैसे एका विशेष निधीमध्ये जमा करत राहतात. गर्भधारणेचे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यात चांगली रक्कम जमा होते. त्‍यामुळे पैसे बचत करण्‍यासाठीच ‘व्हर्चुअल प्रेग्नंसी’चा आधार घेतला जात असल्‍याचेही ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने वृत्तात नमूद केले आहे.

चीनमधील लोकसंख्या आणखी कमी होईल : तज्ज्ञांनी दिला इशारा

चीन मागील काही वर्षांपासून कमी हाेत चालेल्‍या लोकसंख्येवर चिंता व्‍यक्‍त केली जात आहे. आता व्हर्चुअल प्रेग्नंसी’च्‍या लोकप्रियतेमुळे देशाची लाेकसंख्‍या आणखी कमी हाेईल, अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. चीनी तरुणांमधील जबाबदारीचे ओझे टाळण्‍याची वृत्ती वाढत असल्‍याने असे नवीन फॅड तरुणाईमध्‍ये वाढत असल्‍याची टीका ज्‍येष्‍ठ नागरिक करत आहेत. तरुणाई या माध्‍यमातून स्वतःचे मनोरंजन करत पैशांची बचत करून वास्तविक गर्भधारणा आणि त्याच्या चिंतांपासून दूर जायचे आहे. त्यामुळेच चीनमध्ये या प्रवृत्तीला विरोध सुरू झाला आहे. काही लोक याला मानवी सभ्यतेसाठी गंभीर धोकाही असेही संबोधित आहेत.

चीनमधील नात्‍यातील विचित्र प्रयोग यापूर्वीही चर्चेत

केवळ व्हर्च्युअल गर्भधारणाच नाही तर चीनमध्‍ये नात्यांबाबतचे अनेक प्रयोग गेल्या काही वर्षांत चर्चेचा विषय ठरले आहेत.  गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला भाड्याने घेण्यापासून ते बोगस लग्नापर्यंतचा ट्रेंडही देशात वाढला आहे. अनेक चीनी तरुण वयाच्या 30-35 व्या वर्षी स्‍वत:ला काेणी दत्तक घेणार आहे का, यासाठी पालक शोधतात. आपल्‍या व्यस्त नोकऱ्यांमधून मुक्त होण्‍यासाठी ते या मार्गाचा अवलंब करत आहेत. याशिवाय ‘टांग-पिग’ मागील काही दिवसांमध्‍ये चिनी तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहे. टांग-पिंग याचा अर्थ म्हणजे काहीही न करता निष्क्रिय बसणे, असा असून चीनमधील तरुणाई दिवसोंदिवस अधिक निष्‍क्रीय होत चालल्‍याचे मत ज्‍येष्‍ठ नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचा :

 

 

Back to top button