पुढारी ऑनलाइंन डेस्क : गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांविरोधात मुस्लिम देश एकत्र येत आहेत. लवकरच सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये गाझा मुद्द्यावर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष (Iran President ) सौदी अरेबियाला जाणार असल्याचे वृत्त आहे. काही काळापूर्वीपर्यंत इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध कमालीचे बिघडल्याची चर्चा होती, मात्र चीनच्या मध्यस्थीनंतर सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये पुन्हा रुळावर आल्याचे मानले जात आहे.
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आज (दि.११) रियाधला जाणार आहेत. ओआयसीच्या बैठकीत गाझा संकटावर चर्चा होणार आहे. या बैठकीबाबत इराण किती गंभीर आहे, याचा अंदाज यावरून लावता येईल की, इराणने आपल्या तज्ज्ञांची एक टीम रियाधला पाठवली आहे. ही टीम परिषदेदरम्यान जारी करण्यात आलेल्या प्रस्तावाचे विश्लेषण करणार आहे. सौदी अरेबियातील इराणचे राजदूत अलीरेझा इनायती यांनी या ओआयसी बैठकीचे विशेष वर्णन केले आणि सांगितले की, ही बैठक विविध इस्लामिक देशांनी सुचविलेल्या प्रस्तावांवर आधारित असेल.
गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष त्वरित थांबवावा, अशी इस्लामिक देशांची मागणी आहे. मात्र, हमास ओलिसांची सुटका करत नाही तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 12,500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. गाझा पट्टीत सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर आता इस्लामिक देश एकत्र येत आहेत. अलीकडेच इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचीही भेट घेतली. याशिवाय इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही ब्रिक्स देशांना पत्र लिहून गाझा प्रश्नात हस्तक्षेप करून तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच इस्रायलची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही इराणने केली आहे.
हेही वाचा :