

पुढारी ऑनलाईन डेस्क : एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरीसह पदकांची कमाई सुरूच आहे. दरम्यान, आज (दि.२९) सहाव्या दिवशी अनीता आणि नारायण कोंगनापल्ले यांनी दमदार कामगिरी करत पॅरा रोइंग मध्ये PR3 मिश्र दुहेरी स्कल्स फायनल ए आर्टमध्ये रौप्य पदकावर मोहोर उमटवली. या जोडीने टीम इंडियाच्या एकूण पदकांच्या तालिकेत ३० वे रौप्य पदक मिळवून दिले आहे. (Asian Para Games)
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यानंतर आशियाई पॅरा गेम्समध्येही भारतीय खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एक नवा इतिहास रचत भारताने आता पदकांची शंभरी पार केली आहे. भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात आतापर्यंत १०० पदकांवर मोहोर उमटवली आहे. यात २६ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याआधी २०१८ मध्ये इंडोनेशिया पॅरा गेम्समध्ये भारताने ७२ पदके जिंकली होती.