

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-हमास युद्धाचा सातवा दिवस आहे. ( Israel-Hamas War) आतापर्यंत या संघर्षात इस्रायलमधील मृतांची संख्या १,३०० हून अधिक तर १,९०० हून अधिक पॅलेस्टिनींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. इस्त्रायलने हमासविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेत चौफेर हल्ला घडवून आणले आहेत. मात्र हमास हे आव्हान पेलताना दिसत आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते इस्रायल सैन्यासमोर सर्वात मोठे आव्हान हे 'गाझा मेट्रो'ला उद्ध्वस्त करण्याचे आहे. यामुळे गाझा मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जाणून घेवून नेमकं इस्त्रायल सैन्यासमोरील आव्हानाविषयी…
हमासने भूमिगत उभ्या केलेल्या नेटवर्कला गाझा मेट्रो म्हटले जाते. हे नेटवर्क भूमिगत (जमिनीच्या खाली गुप्त बोगदा ) ४१ किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद असा बोगदा आहे, असे बीबीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र इस्रायलमधील संरक्षण तज्ज्ञांच्या मते हा गुप्त बोगदा ४१ किलोमीटरपेक्षा लांब आहे. तसेच त्यामुळे अनेक चक्रव्यूहही आहेत. गाझा मेट्रोचे १०० किलोमीटरपेक्षाही अधिक बोगदे हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केले आहेत, असा दावा २०२१ मध्ये इस्रायली संरक्षण दलाने केला होता. गाझा मेट्रोचे नेटवर्क हे ५०० किमीमीटर पेक्षा अधिक लांब आहे, तसेच याबाबतची ठोस माहिती कोणालाही नाही, असे पॅलेस्टाईनमधील इतिहासकार हॅरेल चोरेव्ह यांनी 'सीएनबीसी'शी बोलताना सांगितले होते.
गाझा पट्टीतील या गाझा मेट्रोची बांधणी दहशतवादी संघटना हमासने केली आहे. यामध्ये नागरिकांसाठी एक थर तर दुसरा थर हमासच्या दहशतवाद्यांसाठी आहे. या गुप्त बोगद्याच्या दुसर्या थरात हमासच्या बंकर आहेत. येथूनच दहशतवादी सर्व गुप्त कारवाया करतात.
'बीबीसी' रिपोर्टनुसार, गाझा पट्टीत गाझा मेट्रोची बांधणी ही इस्रायली नाकेबंदी झुगारत ग्राहकोपयोगी वस्तूंच्या तस्करीसाठी करण्यात आली होती. २००५ मध्ये याच्या बांधणीला सुरुवात झाली. गाझा पट्टीतील खान युनूस, जबलिया आणि शाती या निर्वासिचत छावणीपर्यंत पोहचण्यासाठी ते एक नेटवर्क बनले. यानंतर या नेटवर्कचा ताबा हमासने घेतला. यानंतर हमास संघटनेच्या नेत्यांच्या मुक्कामाचे हे बोगदे सुरक्षित ठिकाण बनले. असे मानले जाते की, हमास दहशतवाद्यांचा कोणाला शोध घेता येवू नये म्हणून गाझामध्ये हे बोगदे जमिनीच्या १०० फूट खाली गाझा पट्टीतील नागरिकांची निवासस्थाने, मशिदी, शाळा आणि इतर सार्वाजनिक इमारतीचंच्या तळ मजल्याखाली हे बोगदे आहेत.
इस्रायलमधील संरक्षण तज्ज्ञांच्या मते, इस्रायली सैन्यासमोर गाझा मेट्रो हे एक मोठे आव्हान आहे. कारण गाझामध्ये जमिनीवर आक्रमण करण्यासाठी इस्रायली सैन्याला हमासने गाझा मेट्रो याला चक्रव्यूहाला भेदावे लागणार आहे. या चक्रव्यूहातून भेदणे कठीण असेल. यामुळे दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
हेही वाचा :