Hamas-Israel War : गोव्यातील यहुदींच्या प्रार्थना स्थळांना संरक्षण; हमास-इस्रायल युध्दाचा परिणाम | पुढारी

Hamas-Israel War : गोव्यातील यहुदींच्या प्रार्थना स्थळांना संरक्षण; हमास-इस्रायल युध्दाचा परिणाम

पणजी; पुढारी वृत्तसेवा : हमास इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इस्रायली संस्थांना सुरक्षा पुरवण्यात येत आहे. त्यात गोव्यातील छबाड हाऊसचाही समावेश आहे. यहुदींची प्रार्थनास्थळे असलेल्या गोव्यातील छबाड हाउसना आवश्यक सुरक्षा देण्यात आल्याची माहिती गोवा पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे.

गोव्यात एकूण यहुदींची 3 प्रार्थनास्थळे, म्हणजे छाबड हाऊस आहेत. त्यातील हणजुणे व मोरजी येथे प्रत्येकी एक तर काणकोणमधील पाळोळे किनारा भागात एक आहे. हणजुणे व मोरजी येथील छाबड हाउस सध्या बंद आहेत, परंतु काणकोणमध्ये चालू आहे. या छाबड हाऊसमध्ये शनिवार व रविवार असे दोन दिवस प्रार्थना होत असते. त्यामुळे या छबाड हाऊसला अधिक सुरक्षा पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पर्यटन हंगामात सरासरी 2 हजार ते 2400 इस्रायली नागरिक गोव्यात येतात. यातील काहीजन दीर्घ पर्यटक व्हिसा घेऊन येतात. सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाला नसल्यामुळे सध्यातरी गोव्यात इस्रायली नागरिक क्वचित असावेत असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button