Israel Hamas War : लंडनमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टिनी समर्थकांमध्ये हाणामारी | पुढारी

Israel Hamas War : लंडनमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टिनी समर्थकांमध्ये हाणामारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. जगभर युद्धानंतर निदर्शने होत आहेत. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे तर कोणी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उभा आहे. ब्रिटनमध्येही युद्धानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी समर्थक असे दोन गट तयार झाले आहेत. सोमवारी रात्री हे दोन्ही गट एकमेकांना भिडले. लंडनमधील हाय स्ट्रीट केन्सिंग्टन ट्यूब स्टेशनवर ही घटना घडली.

हमास आणि इस्रायलच्या समर्थनार्थ लंडनमध्ये विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी निदर्शने हिंसक होत आहेत. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लंडनमधील इस्रायली दूतावासाबाहेर मोठी गर्दी वाढू लागली. हजारो निदर्शक पॅलेस्टिनी झेंडे घेऊन इस्रायलच्या विरोधात धार्मिक घोषणा देत होते. काही लोकांनी इस्रायल दूतावासाजवळ फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. दरम्यान, इस्रायल समर्थक आणि पॅलेस्टाईन समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

हाणामारीची माहिती मिळताच आम्ही तेथे पोहोचलो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आम्ही दोन्ही गटातील लोकांना वेगळे केले. परिसरात शांतता राखणे आणि तणाव लवकरात लवकर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

‘हमास समर्थक दहशतवादी’

दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हमासला पाठिंबा देणाऱ्या लोकांना दहशतवादी म्हटले आहे. या भीषण हल्ल्याला हमासचे समर्थन करणारेच जबाबदार आहेत, असे ट्विट सुनक यांनी केले आहे.

Back to top button