Israel-Hamas war : इस्रायल-हमास संघर्षाचे नेमके कारण काय? युद्धाचा भडका कसा उडाला? जा‍णून घ्या सविस्तर

Israel-Hamas war
Israel-Hamas war
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने शनिवार, ७ ऑक्‍टाेबर राेजी  इस्त्रायलवर रॉकेट हल्‍ला केला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली. इस्रायल-हमास संघर्षाचा भडका उडाला असून, याचे दीर्घकाळ परिणाम होण्याची शक्यता असल्‍याचे वृत्त 'द गार्डियन'ने दिले आहे.  जाणून घेवूया इस्रायल-हमासमधील संघर्षामागील कारण काय? युद्धाचा भडका कसा उडाला याविषयी जाणून घेवूया. ( Israel-Hamas war)

इस्रायल आणि गाझा सीमेवर शनिवारी पहाटे नेमकं काय घडलं?

हमास आणि इस्‍लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्‍त्रायलवर हजारो रॉकेट डागले. यानंतर दहशतवाद्यांनी अत्‍यंत भक्‍कम सुरक्षाकडे भेदत गाझा सीमेजवळील इस्रायलमधील ज्यू वस्‍तीत घुसखोरी केली. नागरिक आणि सैनिकांवर अंदाधूंद गोळीबार केला. नागरिकांना ओलीस ठेवले. या घटनांचे व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. काही दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. गेल्‍या पाच दशकात प्रथमच इस्‍त्रालयवर एवढा मोठा आणि अभूतपूर्व हल्‍ला झाला आहे. या हल्‍ल्‍यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्ध सुरु झाल्‍याचे जाहीर केले. तसेच पॅलेस्टिनींना याची मोठी किंमत मोजावी लागेल,असा इशाराही दिला. (why is hamas attacking israel now)

Israel-Hamas war : आतापर्यंतचा सर्वात भयंकर हल्‍ला

शनिवारी ज्यू सुट्टीचा उत्सव साजरा करणारी गाझा-इस्त्रायल सीमेजवळ संगीत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. एकीकडे दहशतवाद्यांनी रॉकेट हल्‍ला केला तर दुसरीकडे घुसखोरी केलेल्या  दहशतवाद्यांनी संगीत महोत्सवात सहभागी झालेल्‍या इस्रायलच्‍या नागरिकांवर अंदाधूंद गोळीबार केला. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्राईलवरकेलेला  आतापर्यंतचा  सर्वात भयंकर हल्‍ला मानला जात आहे. इस्त्रायली बचाव सेवा 'झका'ने दिलेल्‍या माहितीनुसार, संगीत महोत्सवच्या ठिकाणी किमान २६० मृतदेह सापडतील. शनिवारी रात्री उशिरापर्यंत, इस्रायल संरक्षल दलाने (आयडीएफ) व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार, इस्रायलमध्ये अजूनही घुसखोरी केलेले २०० ते ३०० दहशतवादी आहेत.  ( why is hamas attacking israel now )

Israel-Hamas war : इस्रायलने दिले सडेतोड प्रत्‍युत्तर…

हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर इस्रायलनेही सडेतोड प्रत्‍युत्तर दिले. गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. पंतप्रधान नेतन्याहू यांनी पॅलेस्टिनी नागरिकांनी गाझा पट्टीतून निघून जावे, असा इशारा दिला. हमासने आश्रय घेतलेल्‍या ठिकाणे बेचिराख केली जातील, असेही स्‍पष्‍ट केले. यानंतर इस्‍त्रायलच्‍या लढाऊ विमानांनी गाझा शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक इमारतींना लक्ष्य केले. गाझाला होणारा वीज आणि इंधन पुरवठा खंडित केला आहे, ज्याचा परिणाम लवकरच पट्टीच्या वैद्यकीय सुविधांवर होऊ शकतो.

हवाई हल्‍ल्‍यात मोठ्या इमारती उद्‍ध्‍वस्त, २० मुलांसह सुमारे ४०० पॅलेस्टिनी ठार

गाझावर झालेल्‍या हल्‍ल्‍याचे व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. यामध्‍ये शहरातील अनेक मोठ्या इमारती
उद्‍ध्‍वस्त झाल्‍याचे दिसत आहे. इस्रायल संरक्षल दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्‍हटलं आहे की, दक्षिण इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये ४०० हून अधिक पॅलेस्टिनी दहशतवादी मारले गेले आहेत. एक डझनहून अधिक जेरबंद केले आहेत. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवारपासून गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे २० मुलांसह किमान ४०० पॅलेस्टिनी ठार झाले तर 2,000 जण जखमी झाले आहेत. वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याच्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला, त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. दहशतवादी संघटना हमासने सुमारे 100 इस्रायली लोकांना ओलीस ठेवल्‍याचे वृत्त आहे.

हमास आणि इस्लामिक जिहादने इस्रायलवर हल्ला का केला?

इस्रायलवर झालेल्‍या हल्‍ल्‍यामागील कारणे स्पष्ट नाहीत; परंतु इस्रायली सैनिक आणि वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी यांच्यात काही महिन्यांपासून हिंसाचाराचे सत्र सुरु होते. इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी गावांवर हल्ले केले हाेते. वेस्ट बँकमधील दहशतवादी तळांसह नागरी वस्‍तीवरही हे हल्ले करण्‍यात आले. गेल्या आठवड्यात काही ज्यूंनी जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अल-अक्सा मशिदीच्या आवारात प्रार्थना केली. इस्लाम धर्मियांसाठी हे तिसरे पवित्र स्थान आहे. अल-अक्सा कंपाउंडमध्ये ज्यूंना प्रार्थना करण्याची परवानगी नाही. यामुळे हमास आणि इस्लामिक जिहादने या दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर हल्‍ला केला असावा अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. तसेच इस्त्रायलशी संबंध सामान्य करण्यासाठी सौदी अरेबियाने केलेल्या प्रयत्‍नांना खिळ बसवण्‍यासाठी इराणकडून दहशतवादी हल्‍ल्‍यास प्रोत्साहन दिले गेले असावे असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

इस्रायलसाठी धक्‍कादायक हल्‍ला

हमासने अनेक महिन्यांपासून या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला असावा, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. मात्र या हल्‍ल्‍याची कल्पना इस्रायली गुप्तचरांना कशी आली नाही, असा सवाल आता केला जात आहे. कारण जगात इस्रायलची गुप्‍तचर यंत्रणाही सर्वोत्‍कृष्‍ट मानली जाते. गाझा पट्टीवर उडणाऱ्या ड्रोनसह अत्याधुनिक पाळत ठेवणाऱ्या उपकरणांद्वारे अभेद्य अशी सुरक्षा व्‍यवस्‍था या देशाकडे आहे. तरीही दहशतवादी हल्‍ला झाल्‍याने हा इस्रायलसाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याच्या सरकार आणि लष्कराच्या क्षमतेवरील इस्रायली जनतेचा विश्वास डळमळीत होईल, असे मानले जात आहे. यासंदर्भात इस्रायल नौदलाचे माजी प्रमुख एली मारोन यांनी म्‍हटलं  आहे की, "दहशतवादी हल्‍ला होणे हे एक मोठे अपयश आहे. सुरक्षा दल अपयशी ठरले असून, भविष्‍यात याचे मोठे परिणाम होतील."

पॅलेस्टिनी नागरिकांना बसणार मोठा फटका

हमास या दहशतवादी संघटनेचे २००७ पासून गाझा पट्टीवर वर्चस्‍व आहे. मात्र या संघटनेने शनिवारी केलेल्‍या कृत्‍याची जबर किंमत मोजावी लागेल, असे मानले जात आहे. कारण इस्रायल केवळ गाझामध्येच नव्हे तर वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममध्येही अतिरेकी कारवाया चिरडण्यासाठी आपल्या लष्करी सामर्थ्याचा संपूर्ण ताकद वापरण्याची शक्यता व्‍यक्‍त हाेत आहे.  यासंघर्षात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिक मारले जाण्याची शक्यता आहे. मागील काही तासांमधील हवाई हल्‍ल्‍यात  शेकडाे पॅलेस्टिनी नागरिकांची घरे आणि पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत.

पॅलेस्‍टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी इस्रायलचे सैनिक ओलीस

दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर हमासने अनेक इस्रायलच्या सैनिक ओलीस ठेवल्‍याचे वृत्त आहे. या पूर्वी गिलाड शालित या इस्रायली सैनिकाला हमासने गाझामध्ये पाच वर्षे कैद ठेवले होते, अखेर 2011 मध्ये 1,000 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात त्‍याची सुटका करण्‍यात आली हाेती. आताही पॅलेस्‍टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी ओलीस ठेवलेल्‍या इस्रायलच्या सैनिकांचा वापर हमास करेल, असे मानले जात आहे. दरम्‍यान, हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यामागे इराणचा सहभाग असल्‍याचाही संशय व्‍यक्‍त हाेत आहे. तसेच हिंसाचारामुळे इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यातील कराराला खीळ बसेल, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

गाझामधील नागरिकांचा हमासला पाठिंबा आहे का?

गाझामधील बहुतांश नागरिक हे संघर्षमुक्त जीवन जगू इच्छितात. त्यांच्यावर लादलेले निर्बंध आणि हमासच्या शासकांच्‍या दहशती विरोधात संतापाची लाट आहे. 2006 मध्ये गाझामधील शेवटच्या निवडणुकांपासून हमासच्या समर्थनाची चाचणी घेण्यात आली नाही. त्‍यामुळे गाझामधील नागरिकांचा दहशतवादी संघटना हमासला पाठिंबा असल्‍याचे स्‍पष्‍ट झालेले नाही.

हमासचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र निषेध

इस्रायलवर केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर हमासचा जगभरातून तीव्र निषेध करण्‍यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी अमेरिका उभी आहे. इस्रायलच्या सुरक्षेसाठी माझ्या प्रशासनाचा पाठिंबा आहे, अशा शब्‍दांमध्‍ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना संदेश दिला आहे.

या प्रश्‍नी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने रविवारी तातडीची बैठक घेतली. दरम्यान,लेबनॉन-इस्त्रायल सीमेवर संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षक दलांना तैनात करण्यात आले आहे. तसेच इजिप्‍तच्‍या सरकारने स्‍पष्‍ट केले आहे की, या प्रश्‍नी तोडगा काढण्‍यासाठी सौदी अरेबिया आणि जॉर्डनशी चर्चा करण्‍यात येत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news