History of Hamas | इस्राईलवर ५ हजार रॉकेट हल्ले करणारी ‘हमास’ कोण आहे? | पुढारी

History of Hamas | इस्राईलवर ५ हजार रॉकेट हल्ले करणारी 'हमास' कोण आहे?

Israel Palestine conflict : 'हमास' इतकी प्रबळ कशी झाली?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने आज (दि.७)  गाझा पट्टीतून इस्राईलवर ५ हजार रॉकेट डागले. अचानक झालेल्या या हल्ल्यात इस्राईलमधील ४० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर दुसरीकडे इस्राईलने गाझा पट्टीत लष्करी मोहीम सुरू केली आहे. हमाससोबत तणाव नसून युद्ध आहे, असे इस्राईलने स्‍पष्‍ट केले आहे. हमास संघटना इतकी प्रबळ कशी झाली, या संघटनेचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊ. (History of Hamas)

हमास म्हणजे काय? What is Hamas? History of Hamas 

हमास पॅलेस्टाईनमधील सर्वांत मोठा दहशतवादी गट आहे, असे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. तसेच हमास पॅलेस्टाईनमधील राजकीय पक्षसुद्धा आहे. गाझा पट्टीतील जवळपास २० लाख लोकसंख्या असलेल्या भूभागाचा ताबा हमासकडे आहे. इस्राईलविरोधात सशस्त्र लढा देणारी संघटना, अशी हमासची ओळख आहे. हमास एक प्रकारची सैन्‍यदला प्रमाणे काम करते. इस्राईल,अमेरिका,युरोपियन युनियन, ब्रिटन आणि इतरही अनेक देशांत हमासवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

हमासची स्थापना कशी झाली? How was Hamas formed? History of Hamas 

‘हमास’ची स्थापना १९८०च्या दशकात झाली. पॅलेस्टाईनमध्ये इस्राईलविरोधात उठाव झाला होता. त्यातून हमासची स्थापना झाली. १९६७च्या इस्राईल-अरब युद्धानंतर इस्राईलने वेस्ट बँक आणि गाझा पट्टीवर ताबा मिळवला होता. त्याविरोधात पॅलेस्टाईनमध्ये हा उठाव झाला. १९४६ला पॅलेस्टाईन मुस्लिम ब्रदरहूडची स्थापना झाली होती, त्याचेच बदलेले स्वरूप म्हणजे हमास होय. १९८७ला जेव्हा पॅलेस्टाईनमध्ये उठाव झाला तेव्हा हमासची स्थापना झाली. इस्राईलला चोख उत्तर देणे, हे हमासचे लक्ष होते. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन १९६०पासून इस्राईलाला सशस्त्र विरोध करत होती; पण या संघटनेने नंतरच्या काळात इस्राईलविरोधातील सशस्त्र संघर्ष थांबवला आणि इस्राईलच्या अस्तित्वाला मान्यता दिली. यातून पॅलेस्टाईनमध्ये पराभवाची भावना निर्माण झाली, त्यातून पुढे हमासची स्थापना झाली.

हमासचा इस्रालईला विरोध कसा सुरू केला? How did Hamas begin its ‘resistance’?

पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि इस्राईल यांच्यात ओस्लो शांतता करार झाला. यातून इस्राईलच्या बरोबरीनेच पॅलेस्टाईन राज्याची स्थापना झाली. हमासने या कराराला कडाडून विरोध केला. हा करार मोडून काढण्यासाठी हमासने आत्मघातकी हल्ले सुरू केले. सार्वजनिक बसेस आणि इतर ठिकाणी आत्मघाती बाँबहल्ले करून हमासने अनेक इस्राईली नागरिकांना मारले होते. १९९५ला हमासचा म्होरक्या याहया अय्याश याला इस्राईलने मारले, त्यानंतर हे हल्ले थांबले. तर दुसरीकडे इस्राईलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांचा उदय झाला होता, त्यांचाही ओस्लो कराराला विरोध होता. २००२-२००५ या काळात हमासने पुन्हा डोके वर काढले आणि पुन्हा आत्मघाती हल्ले सुरू केले. तोपर्यंत इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शांतता प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली होती.

हमासला राजकीय बळ कसे मिळाले? How did Hamas gain political power?

2006मध्ये वेस्ट बँक आणि गाझा पट्टी येथील मर्यादित पॅलेस्टाईन परिषदेच्या निवडणुकीत हमासने मोठा विजय मिळवला. इस्राईल विरोधातील कडवी भूमिका,  शाळा, दवाखाने सुरू करणे, गरिबांना मदत करणे अशा गोष्टींमुळे हमासला हा विजय मिळवता आला.

काही महत्त्वाचे संघर्ष

२०१४मध्ये हमास आणि इस्राईल यांच्यात संघर्ष झाला, त्यात २,२५१ पॅलेस्टिनींचा बळी गेला, तर इस्राईलचे ६७ सैनिक मारले गेले. मे २०२१मध्येही अल अक्सा मशिदीच्या कपाऊंड जवळ इस्राईलचे सैनिक आणि हमास यांच्यात संघर्ष झाला होता. हा संघर्ष ११ दिवस चालला हाेता.

हेही वाचा

Back to top button