न्यूयॉर्क : भारतात गेल्या फेब्रुवारी महिन्यातील तापमानाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र, मार्चमध्ये पावसाचे वातावरण तयार झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. जगात अशी काही ठिकाणे आहेत की तेथे माणूस राहूच शकत नाही. अशा काही ठिकाणांपैकी दोन ठिकाणचे तापमान तब्बल 70 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविले गेले आहे.
जगातील अत्यंत जास्त तापमान असणारे ठिकाण इराणमध्ये आहे. या देशातील बंदर-ए-महशायर येथे जुलै 2015 मध्ये सर्वाधिक तब्बल 74 अंश सेल्सिअस इतके जास्त तापमान नोेंदविले गेले. तत्पूर्वी, येथील सर्वाधिक तापमान 51 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. इराणमधील दश्त-ए-लूट या ठिकाणी 2003 ते 2009 या दरम्यान जमा करण्यात आलेल्या आकडेवारीत जास्तीत जास्त तापमान 70.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते.
इस्राईलमधील तिरात ज्वी येथील किबूटज या ठिकाणी आशियातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. जून 1942 साली येथे विक्रमी 54 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले होते. उन्हाळ्याच्या दिवसात या भागात सरासरी 37 अंश सेल्सिअस इतके तापमान असते.
सुदानमधील वाडी हाल्या शहरात पाऊसच पडत नाही. या शहरात सर्वाधिक उष्ण जून महिना असतो. या शहराचे सरासरी तापमान 41 अंश सेल्सिअस इतके आहे. येेथे एप्रिल 1963 मध्ये सर्वाधिक 53 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.
लिबियातील वाळवंटी भागात वसलेले घडामेस हे शहर युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविस्ट आहे. हे शहर मातीने बनलेल्या झोपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात सुमारे सात हजार लोक राहतात. येथील सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस इतके असते.