Indian High Commissioner to UK | ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखले, काय आहे प्रकरण? | पुढारी

Indian High Commissioner to UK | ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखले, काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव वाढत आहे. त्याचा परिणाम आता स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे दिसून आला. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना शुक्रवारी (दि.२९) सप्टेंबर रोजी ग्लासगो येथील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. शीख युथ यूकेच्या इंस्टाग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, खलिस्तानला समर्थन करणारा एक व्यक्ती अल्बर्ट ड्राइव्हवरील ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून दोराईस्वामींना रोखताना दिसत आहे. (Indian High Commissioner to UK)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूद्वारातील ‘या’ प्रकारानंतर ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी वादात पडण्याऐवजी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. हा मुद्दा ब्रिटनचे परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांकडेही मांडण्यात आला आहे.

भारतीय अधिकाऱ्यांना गुरुद्वाराला भेट देण्यास अधिकृतपणे बंदी असल्याचा दावा ‘शीख युथ यूके’ने केला आहे. व्हिडिओनुसार, पार्किंगमध्ये दोन लोक उच्चायुक्तांच्या कारजवळ उभे आहेत आणि त्यापैकी एक कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. कथित व्हिडिओमध्ये उच्चायुक्तांची कार गुरुद्वारा संकुलातून बाहेर पडताना दिसत आहे, हे खरे असल्याचा दावा  ‘शीख युथ यूके’ केला आहे.

Indian High Commissioner to UK: काय आहे प्रकरण?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्पष्टपणे असे म्हणताना ऐकू येते की, ‘कॅनडा आणि इतर ठिकाणी शीखांचे नुकसान होत आहे, प्रत्येक शीखने भारतीय राजदूताचा निषेध केला पाहिजे. तर या प्रकारा संदर्भात एका खलिस्तान समर्थक कार्यकर्त्याने सांगितले की, भारतीय उच्चायुक्त अल्बर्ट ड्राइव्हवर ग्लासगो गुरुद्वाराच्या गुरुद्वारा समितीसोबत बैठक घेणार होते. काही लोकांनी त्याचे स्वागत केले नाही,  ते तेथून निघून गेले. दरम्यान किरकोळ बाचाबाची झाली. खलिस्तान समर्थकाने सांगितले की, मला वाटत नाही की गुरुद्वारा समिती जे काही घडले त्याबद्दल खूप आनंदी आहे. परंतु ब्रिटनमधील कोणत्याही गुरुद्वारामध्ये भारतीय अधिकाऱ्यांचे स्वागत नाही, असेही या खलिस्तानी समर्थकाने स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button