BRICS : ब्रिक्स हे विकासासह चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यापक व्यासपीठ; पीएम मोदी | पुढारी

BRICS : ब्रिक्स हे विकासासह चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यापक व्यासपीठ; पीएम मोदी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्स या संघटनेच्या माध्यमातून विकासासह चिंतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. 22 ते 24 ऑगस्ट रोजी जोहान्सबर्ग या ठिकाणी परिषद होणार आहे. तत्पूर्वी, त्यांनी निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दक्षिण आशियाई देशांसह जगातील अन्य देशांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी ब्रिक्स महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. सदस्य राष्ट्रांमधील एकमेकांचा विकास आणि भेडसावणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी ब्रिक्सच्या व्यासपीठाचा उपयोग होणार आहे. भविष्यात कोणकोणत्या क्षेत्रांत सहकार्य करता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा होईल. संस्थात्मक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले टाकता येणार आहेत. या परिषदेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य आणि भागीदारी करण्याबाबतच्या करारावर सहमती होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंगही या दौर्‍यात सहभागी होणार असल्याचे चीनच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, मोदी आणि जिनपिंग यांची या परिषदेत वन टू वन चर्चा होणार की नाही, याबाबत मात्र दुजोरा मिळू शकलेला नाही. ब्रिक्स संघटनेमध्ये आणखी काही देशांचा समावेश करण्याबाबतही या परिषदेत चर्चा होणार आहे.

वन टू वन चर्चा करणार

सर्वसमावेशक विकासासाठी बहुआयामी यंत्रणा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने या बैठकीत मंथन होईल. मोदी यांनी एक्सवरून निवेदन प्रसारित केले आहे. ब्रिक्स देशांच्या प्रमुखांशी वन टू वन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

40 वर्षांत ग्रीसला पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांची भेट

ब्रिक्स परिषदेनंतर ते अथेन्स, ग्रीसला भेट देणार आहेत. गेल्या 40 वर्षांत ग्रीसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरण्याचा मान आपणास मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांना हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे ग्रीस दौर्‍यात उभय देशात बहुउद्देशीय करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button