X चे फॉलोअर्स घटणार! एलॉन मस्क यांचे ४२ टक्के फॉलोअर्स फेक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे ‘X’ प्लॅटफॉर्मवरील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना बहुतेक लोक फॉलो करतात. १५३ दशलक्षाहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात. मात्र या दरम्यान त्यांच्या फॉलोअर्सशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मॅशेबलच्या अहवालानुसार, मस्क यांचे सुमारे ४२ टक्के फॉलोअर्स फेक आहेत. फॉलोअर्स वाढण्याचे कारण निष्क्रिय खाती आणि नवीन खाती आहेत. तसेच त्यांच्या फॉलोअर्समध्ये ६.५ कोटीहून अधिक अशी खाती आहेत की ज्यांचा एकही फॉलोअर नाही.
एलॉन मस्क यांच्या एकूण फॉलोअर्सपैकी केवळ ४,५३,००० किंवा ०.३ टक्के लोकांनी ‘X’ प्रीमियमचे सदस्यत्व घेतले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, मस्क यांच्या फॉलोअर्सपैकी ७२ टक्के युजर्सचे दहा पेक्षा कमी फॉलोअर्स आहेत. मस्क यांचे सर्वच फॉलोअर्स खरे नाहीत हे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. तसेच १० कोटी अधिक फॉलोअर्सनी त्यांच्या अकाउंटवर १० पेक्षा कमी ट्विट केले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटर खरेदी केले होते. तेव्हापासून त्यांनी कंपनीचे संपूर्ण स्वरूपच बदलून टाकले आहे. काही काळापूर्वी मस्क यांनी X वर महिन्यातील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या शेअर केली होती. ती सुमारे ५४ कोटी आहे जी गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक पटींनी वाढली आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांच्या फॉलोअर्सपैकी ४ कोटीहून अधिक लोकांनी ऑक्टोबरनंतर त्यांचे खाते तयार केले आहे. यावरून हे फॉलोअर्स बनावट असल्याचे समजले जात आहे.
हेही वाचा :