US Fed Rate Hike | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पुन्हा वाढ, दराने २२ वर्षांचा उच्चांक गाठला | पुढारी

US Fed Rate Hike | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पुन्हा वाढ, दराने २२ वर्षांचा उच्चांक गाठला

पुढारी ऑनलाईन :  US Fed Rate Hike : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदरात ०.२५ टक्के म्हणजेच २५ बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. देशातील वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने हा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हच्या गेल्या १२ पतधोरण आढावा बैठकीत ११ वेळा व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आताच्या ताज्या वाढीमुळे अमेरिकेतील व्याजदर २२ वर्षातील सर्वाधिक उच्चपातळीवर पोहोचला आहे. सध्याचा अमेरिकेतील व्याजदर ५.२५-५.५० टक्क्यांदरम्यान गेला आहे. यापूर्वी जानेवारी २००१ मध्ये व्याजदराने ही पातळी गाठली होती. (US Fed Rate Hike)

महागाई नियंत्रित करण्यासाठी फेड रिझर्व्हने व्याजदरवाढ कायम ठेवली आहे. आता पुन्हा व्याजदर वाढल्याने गृहकर्ज आणि इतर प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.

फेडने यावर्षी व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत फेडरल रिझर्व्ह असे निर्णय घेऊ शकते. याचाच अर्थ असा की भविष्यात व्याजदरात आणखी वाढ होऊ शकते, हे स्पष्ट आहे. (US Fed Rate Hike)

जूनमध्ये फेडने म्हटले होते की आर्थिक डेटा पाहिला जाईल आणि २ टक्के महागाईचे लक्ष्य गाठण्यासाठी अतिरिक्त धोरण दृढतेची मर्यादा निश्चित करण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दरवाढीच्या परिणामांचा अभ्यास करेल.

अमेरिकेत जूनमध्ये महागाईचा दर ३ टक्के होता. गेल्या वर्षी तो ९ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर देशातील महागाईने चार दशकांचा विक्रम मोडला होता.

हे ही वाचा :

Global Warming : जपान ते अमेरिका, जगाची उकाड्याने काहिली; अनेक शहरात उच्चांकी तापमानाने विक्रम मोडले; जंगलांमध्ये वणवा

अमेरिका पोळतोय! तापमान धोक्याच्या पातळीवर

Back to top button