अमेरिका पोळतोय! तापमान धोक्याच्या पातळीवर | पुढारी

अमेरिका पोळतोय! तापमान धोक्याच्या पातळीवर

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : भारतात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पुराची समस्या उद्भवलेली असताना अमेरिकेतील तापमान सातत्याने वाढत चालले आहे. पुढच्या आठवड्यात अमेरिकेतील तापमान धोकादायक पातळी ओलांडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील 11 कोटी 30 लाख लोक तर उष्ण लाटांच्या सावटाखाली आहेत.

सतर्कता म्हणून फ्लोरिडा, कॅलिफोर्नियासह वॉशिंग्टनमध्ये प्रशासनाकडून आगाऊ अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अमेरिकेच्या एरिझोना प्रांतात शनिवारी तापमानाचा पारा 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. दुसरीकडे कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्येही भयावह स्थिती होती. येथील तापमानाचा पारा पुढील आठवड्यात 54 अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे.

इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनीत अलर्ट

इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंडमध्ये युरोपीयन अंतराळ संस्थेने उष्णतेबाबतचा अलर्ट जारी केला आहे. इटलीतील रोममध्ये तापमान 44 अंशांपर्यंत जाऊ शकते. स्पेनमधील वाढत्या तापमानामुळे कॅनरी बेटांतील जंगलात वणवा पेटला आहे. ग्रीसमधील लोकही उष्णतेमुळे हैराण झाले आहेत.

हवामान बदलाचे परिणाम

50 लाखांवर लोक जगात दरवर्षी अती उष्णता वा अती थंडीमुळे मरतात.
2019 मधील केंब्रिज विद्यापीठातील संशोधनानुसार यामुळे मानवाची उंची, मेंदूचा आकार कमी होऊ शकतो.
300 हून अधिक मानवांच्या मृतदेहांवर आणि सांगाड्यांवर त्यासाठी संशोधन झाले होते.
3 लाख वर्षांपूर्वीचा होमो हॅबिलिस या मानवाचा मेंदू आजच्या माणसांपेक्षा 3 पट मोठा होता
डेथ व्हॅलीत विक्रम मोडणार
डेथ व्हॅली हे जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांपैकी एक आहे. पुढील आठवड्यात येथील तापमान मागचे सर्व विक्रम मोडीत काढणार आहे.

Back to top button