Rafale deal | नौदलाची ताकद वाढणार, २६ नव्या राफेल खरेदी निर्णयावर शिक्कामोर्तब | पुढारी

Rafale deal | नौदलाची ताकद वाढणार, २६ नव्या राफेल खरेदी निर्णयावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सौद्यावर मोहर उमटली आहे. याची माहिती शनिवारी केंद्र सरकारकडून देण्यात आली. भारतीय नौदलाला अत्याधुनिक लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी नौदलाच्या राफेलची निवड सरकारने शनिवारी जाहीर केली. फ्रान्समधील राफेल जेटची २६ नेव्हल व्हेरिएंट आधीच सेवेत असलेल्या ३६ राफेल विमानांच्या ताफ्यात सामील होतील, असे फ्रान्सची एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने (Dassault Aviation) म्हटले आहे. (Rafale deal)

भारतामध्ये आयोजित केलेल्या यशस्वी चाचणी मोहिमेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणीदरम्यान राफेलने भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण केल्या आणि त्याच्या विमानवाहू वाहकाच्या वैशिष्ट्यांना पूर्णपणे अनुकूल असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्याला ज्या दिवशी सुरुवात केली त्याच दिवशी भारताने फ्रान्सकडून २६ राफेल जेट विमाने आणि तीन फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावांना गुरुवारी मंजुरी दिली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) राफेल खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. २६ पैकी ४ राफेल-एम जेट्स, डेक-आधारित प्लॅटफॉर्मची नौदल व्हेरिएंट ट्रेनर विमान असतील, असे संरक्षण आस्थापनातील सूत्रांनी सांगितले.

करारावर स्वाक्षरी केल्याच्या तीन वर्षांच्या आत विमानाची डिलिव्हरी सुरू होईल, असेही सांगण्यात आले आहे. अंतिम सौद्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी जवळपास एक वर्ष लागू शकेल. कारण किंमतीबाबत वाटाघाटी केल्या जाणार आहेत. (Rafale deal)

हे ही वाचा :

Back to top button