पुढारी ऑनलाईन डेस्क : Chandrayaan-3 Launch Date : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बहुप्रतिक्षित चांद्रयान-3 या मोहिमेच्या प्रक्षेपणाबाबत मोठी घोषणा केली आहे. इस्रोने चांद्रयान-3 या मोहिमेच्या प्रक्षेपण तारखेची पुष्टी केली आहे. 13 जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी जाहीर केले. चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या मते अंतराळ क्षेत्रात भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल.
चांद्रयान-3 च्या प्रेक्षपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून अनेक शास्त्रज्ञ कठोर परिश्रम घेत आहेत. हे अंतराळयान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच व्हेईकल मार्क-III (LVM3) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चांद्रयान-2 चा पुढील प्रकल्प आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि तेथील पृष्ठभागाच्या चाचण्या घेईल. त्यात लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे.
चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 सारखेच दिसायला आहे. ज्यात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. चांद्रयान-3 हे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल यांचे मिश्रण आहे. त्याचे एकूण वजन 3,900 किलो आहे. एकट्या प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन 2,148 किलो आहे जे लँडर आणि रोव्हरला 100-किमी चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. मोहिमेच्या यशस्वितेसाठी, नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत, अल्गोरिदम सुधारण्यात आले आहेत आणि चांद्रयान-2 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलेल्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चांद्रयान-2 हे 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. सुमारे 2 महिन्यांनंतर, 7 सप्टेंबर 2019 रोजी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले विक्रम लँडर क्रॅश झाले. त्यानंतर इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेची तयारी सुरू केली.
रोव्हरचे वजन 26 किलो आहे. हे रोव्हर चांद्रयान-2 च्या विक्रम रोव्हरसारखेच असेल, यात सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल 758 वॅट पॉवर, लँडर मॉड्यूल 738 वॅट आणि रोव्हर 50 वॅट्सची शक्ती निर्माण करेल.