‘वॅगनर’चे प्रमुख प्रिगोझीन यांनी घेतला बेलारुसमध्‍ये आश्रय | पुढारी

'वॅगनर'चे प्रमुख प्रिगोझीन यांनी घेतला बेलारुसमध्‍ये आश्रय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियातील बंडखोर वॅगनर खासगी लष्कर समूहाचे प्रमुख येवगिनी प्रिगोझीन ( Yevgeny Prigozhin ) यांनी बेलारुसमध्‍ये आश्रय घेतला आहे, अशी माहिती खुद्‍द बेलारुसचे अध्‍यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी दिली. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीमुळे प्रिगोझीन यांनी नेमका कोठे आश्रय घेतला या चर्चेवर पडदा पडला आहे. तसेच रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने स्‍पष्‍ट केले आहे की, रशियाविरोधात बंड करणार्‍यांविरोधात तपास केला जाणार नाही.

Yevgeny Prigozhin : वॅगनर ग्रुप आपली सर्व शस्त्रे मंत्रालयाकडे परत करणार

रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध बंड करणार्‍या येवगिनी प्रिगोझीन यांची चौकशी करण्‍यात येणार नाही. रशियन अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्‍पष्‍ट केले की, वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन आणि इतर सर्व लढाऊ सैनिकांवरील आरोप वगळण्यात आले आहेत. वॅगनर ग्रुप जड लष्करी उपकरणांसह आपली सर्व शस्त्रे मंत्रालयाकडे परत करण्याची तयारी करत आहे, असे वृत्त ‘आरआयए’ या वृत्तसंस्थेने मंगळवारी संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे.

पुतिन यांनी सोमवारी रशियाविरोधातील बंडावेळी मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांना श्रद्धांजली वाहिली. बंडानंतर आपल्या पहिल्या भाषणात पुतिन म्हणाले होते की, देशाच्‍या या शूर वैमानिकांनी आपल्‍या प्राणाची आहुती देवून रशियाला मोठ्या संकटातून वाचवले. वैमानिकांना पुतिन यांनी दिलेली श्रद्धांजली या वृत्तांची पुष्टी करते की, प्रीगोझिनच्या वॅगनर मिलिशियाने रोस्तोव-ऑन-डॉन शहराच्या ताब्यात असताना अनेक विमाने खाली पाडली.

पुतिन यांनी घेतली सैनिकांची भेट

पुतिन यांनी मंगळवारी क्रेमलिनच्या कॅथेड्रल स्क्वेअरमध्ये सैनिकांना भेट घेतली. सैनिक आणि सुरक्षा सेवेतील कर्मचाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी मॉस्कोमध्ये गृहयुद्धाची परिस्थिती टाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

वोरोनेझ अण्वस्त्रसाठा ताब्यात घेऊन प्रिगोझीनने पुतीनना नमवले!

रशियातील बंडखोर वॅगनर खासगी लष्कर समूहाचे प्रमुख येवगिनी प्रिगोझीन यांनी रोस्तोव्ह शहरानंतर मॉस्कोपासून सुमारे 500 कि.मी.वरील वोरोनेझ शहरातील अण्वस्त्रसाठाही ताब्यात घेतला होता. त्यामुळेच रशियन सरकारी सैन्य बचावात्मक पवित्र्यात आले आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सहमती द्यावी लागली. नंतर पुतीन यांच्या सांगण्यावरूनच बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी प्रिगोझीन यांना वाटाघाटीस तयार केले, असे वृत्त आता समोर आले आहे.

स्वत:च्या सुरक्षिततेची हमीसाठी अण्वस्त्रसाठ्याचा वापर

प्रिगोझीन यांना मॉस्कोला जायचेच नव्हते, मॉस्कोच्या दिशेने सुरू केलेली कूच अर्ध्यावर सोडून व्होरोनेझमधील आण्विकसाठ्याच्या दिशेने त्यांनी मोर्चा वळविला आणि आपली मोहीम संपविली. या अण्वस्त्रसाठ्याचा वापर प्रिगोझीन यांनी स्वत:च्या सुरक्षिततेची हमी म्हणून केला. पुतीन यांना ती द्यावी लागली आणि प्रिगोझीन सुरक्षितपणे बेलारूसला पोहोचू शकले.

हेही वाचा :

 

 

Back to top button