नवी दिल्ली / वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी साजिद मीर (Sajid Mir) याला संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावास विरोध केल्यामुळे भारताने चीनला फटकारले आहे. मीरला पाठीशी घालण्यासाठी दुटप्पी भूमिका घेऊ नका, अशा शब्दांत भारताने चीनला खडे बोल सुनावले.
भू-राजकीय सोयीसाठी चीनने आडमुठी भूमिका घेतली असल्याची टीका भारताने केली. संयुक्त राष्ष्ट्र संघातील भारताचे संयुक्त सचिव प्रकाश गुप्ता म्हणाले की, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे कारनामे आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पडले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट याच संघटनेने रचला होता. या संघटनेचा दहशतवादी मीर याचा विविध दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचे इंटरपोलसह अन्य तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आले आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेमध्ये मीर याला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. (Sajid Mir)
चीनने मात्र या प्रस्तावास विरोध दर्शविला आहे. हा विरोध अनाकलनीय आहे. स्वार्थी राजकारणासाठी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे कृत्य निंदणीय आहे. मीरसारख्या मोकाट दहशतवाद्यास आपण युनोच्या दहशतवाद्यांच्या यादीत घेण्यास समर्थ न ठरल्यास आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादविरोधी लढ्याचा मुकाबला कसा, अशा शब्दांत गुप्ता यांनी चीनवर शरसंधान साधले. दहशतवादी हा दहशतवादी असतो. चांगला आणि वाईट असा फरक करू चीनने दुटप्पी भूमिका घेऊ नये, अशा शब्दांत गुप्ता यांनी चीनला खडे बोल सुनावले.
सुरक्षा परिषदेत मीरची ध्वनिफीतच सादर
15 वर्षांपूर्वी 26/11 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या कटात लष्कर-ए-तोयबाचा सहभाग असल्याचे पुरावे भारताने संयुक्त राष्ट्र संघात सादर केले आहे. गुप्ता यांनी सुरक्षा परिषद मीर याच्या संभाषणाची ध्वनिफीतच सादर केली. या ध्वनिफीतमध्ये मीर हा ताज हॉटेलमधील परदेशी पर्यटकांची हत्या करण्याची सूचना सहकारी दहशतवाद्यांना देत असल्याचे उघड झाले आहे.
अधिक वाचा :