US Spelling Bee | भारतीय वंशियांचा जगभरात डंका! १४ वर्षीय देव शाह ठरला अमेरिकेतील स्पेलिंग बी स्पर्धेचा विजेता | पुढारी

US Spelling Bee | भारतीय वंशियांचा जगभरात डंका! १४ वर्षीय देव शाह ठरला अमेरिकेतील स्पेलिंग बी स्पर्धेचा विजेता

पुढारी ऑनलाईन : मूळ भारतीय वंशाचा १४ वर्षीय देव शाह (Dev Shah) याने अमेरिकेतील प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा २०२३ (Scripps National Spelling Bee 2023) जिंकली आहे. त्याने ११ अक्षरी ‘psammophile’ शब्दाचे अचूक स्पेलिंग सांगून या स्पर्धेत बाजी मारली. त्याला या स्पर्धेचा विजेता म्हणून ५० हजार डॉलरचे रोख बक्षीस मिळाले आहे. (US Spelling Bee)
देव याने यापूर्वी २०१९ आणि २०२१ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता. तो आता स्पेलिंग बी स्पर्धेचा ९५ वा चॅम्पियन बनला आहे. तो फ्लोरिडा येथील रहिवाशी आहे.

“हे एक स्वप्न आहे. माझे पाय अजूनही थरथर कापत आहेत,” अशी प्रतिक्रिया देव शाहने अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात झालेली ही स्पर्धा जिंकल्यानंतर व्यक्त केली. तर अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील १४ वर्षीय शार्लोट वॉल्शने या स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. देव याने ज्या शब्दाचे स्पेलिंग अचूक दिले तो शब्द ‘Psammophile’ असा होता, ज्याचा उल्लेख मरियम-वेबस्टरने वाळूच्या प्रदेशात वाढणारा जीव म्हणून केला होता.

जेव्हा विजेता म्हणून त्याच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्याचे आई- वडील भावूक झाले. देव जगभरातील १ कोटी १० लाख स्पर्धकांपैकी ११ फायनलिस्टपैकी एक होता. प्राथमिक फेरीला मंगळवारी सुरुवात झाली होती आणि बुधवारी उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरी पार पडली.

गेली अनेक वर्षे भारतीय- अमेरिकन स्पर्धेकांचे राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेवर वर्चस्व राहिले आहे. ही स्पर्धा १९२५ मध्ये सुरू झाली होती. ही स्पर्धा आठव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्पेलिंग बी स्पर्धा २०२० मध्ये रद्द करण्यात आली होती. पण २०२१ मध्ये त्यात काही बदल करुन ती पुन्हा सुरु करण्यात आली.

गेल्या वर्षी ही स्पर्धा टेक्सासमधील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या हरिणी लोगन या मुलीने जिंकली होती. तिने या स्पर्धेत भारतीय-अमेरिकन असलेल्या विक्रम राजू याला हरवले होते. (US Spelling Bee)

 

Back to top button