

सिडनी, (ऑस्ट्रेलिया) : पुढारी ऑनलाईन; पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Prime Minister Anthony Albanese) यांनी, "भविष्यात अशा घटकांवर कडक कारवाई करू," असे आश्वासन दिल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. पीएम मोदी यांनी बुधवारी सिडनी येथे अँथनी अल्बानीज यांच्याशी या मुद्यावर द्विपक्षीय चर्चा केली. (PM Modi in sydney)
अल्बानीज यांच्यासोबत संयुक्त निवेदन सादर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि मी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर यापूर्वीही चर्चा केली होती. आम्ही आजही या विषयावर चर्चा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण आहेत. या संबंधांना बाधा पोहोचवणारी काही घटकांची कृती आम्ही सहन करणार नाही. पंतप्रधान अल्बानीज यांनी आज पुन्हा एकदा आश्वासन दिले की ते भविष्यातही अशा घटकांवर कठोर कारवाई करतील.
ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये अलीकडेच खलिस्तानी समर्थक आणि भारत समर्थक निदर्शकांमधील संघर्षाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच भारतीय झेंडे जाळण्याचे आणि एका हिंदू मंदिराचीही तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत.
यापूर्वी अल्बानीज यांनी मार्चमध्ये त्यांच्या भारत भेटीदरम्यान सांगितले होते की ऑस्ट्रेलिया धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले सहन करणार नाही आणि हिंदू मंदिरांवरील हल्ले रोखले जातील.
पंतप्रधान मोदींना दिलेल्या आश्वासनाबाबत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना अल्बानीज म्हणाले, "मी त्यांना आश्वासन दिले की ऑस्ट्रेलिया हा लोकांच्या श्रद्धेचा आदर करणारा देश आहे. धार्मिक स्थळांवरील हल्ले मग ती हिंदू मंदिरे, मशिदी आणि चर्च असोत आम्ही अशा प्रकारची टोकाची कृती आणि हल्ले सहन करणार नाही. ऑस्ट्रेलियात याला स्थान नाही."
"आणि आम्ही पोलिसांच्या आणि आमच्या सुरक्षा एजन्सींच्या मार्फत यावर कारवाई करू आणि जे यासाठी जबाबदार आहेत त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. आमचे एक सहिष्णु बहुसांस्कृतिक राष्ट्र आहे आणि वाईट कृतींना ऑस्ट्रेलियामध्ये कोणतेही स्थान नाही," असे अल्बानीज यांनी संयुक्त निवेदनात त्याचे म्हणणे मांडले. (pm modi in australia)
"गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अशा बातम्यांमुळे भारतातील लोकांना चिंता वाटणे साहजिक आहे. मी पंतप्रधान अल्बानीज यांच्याकडे या मुद्यावर चर्चा केली आहे. त्यांनी मला आश्वासन दिले आहे की भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी त्यांचे विशेष प्राधान्य असेल," असे पीएम मोदी म्हणाले.
यावर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराची खलिस्तान समर्थकांनी तोडफोड केली होती. १६ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियातील कॅरम डाउन्स येथील श्री शिव विष्णू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. १२ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या मिल पार्कमधील BAPS स्वामीनारायण मंदिरावर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी भित्तिचित्रे रंगवण्यात आली होती. मिल पार्कच्या उपनगरात असलेल्या मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहून मंदिराची तोडफोड केली होती, असे वृत्त द ऑस्ट्रेलिया टुडेने दिले होते.
हे ही वाचा :