S. P. Hinduja : हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एस.पी. हिंदुजा यांचे निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास | पुढारी

S. P. Hinduja : हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एस.पी. हिंदुजा यांचे निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ उद्योगपती आणि हिंदुजा बंधूमधील एस.पी. हिंदुजा यांचे बुधवारी (दि.१७) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. हिंदुजा कुटुंबियांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. हिंदुजा समुहाचे अध्यक्ष एस.पी. हिंदुजा यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती प्रवक्त्याने दिली. ते बरेच दिवस आजारी होते. ते स्मृतीभ्रंश या आजारापासून त्रस्त होते. हिंदुजा बंधुंमध्ये एस.पी. हिंदुजा हे सर्वात मोठे होते. त्यांच्या पत्नी मधु हिंदुजा यांचे यावर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. (S. P. Hinduja)

कौटुंबिक प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, ‘आज आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एस.पी. हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अतिशय दुःख होत आहे. ते कुटुंबाचे गुरू होते. इंग्लंड आणि भारत देशातील संबंध मजबूत करण्यात त्यांनी आपल्या भावांसोबत महत्त्वाची भूमिका बजावली. (S. P. Hinduja)

पाकिस्तान मध्ये झाला होता जन्म

श्रीचंद पी. हिंदुजा यांना एस.पी. म्हणूनही ओळखले जात होते. हिंदुजा ग्रुपचे संस्थापक पी.डी. हिंदुजा यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म १९३५ मध्ये कराची (पाकिस्तान) येथे झाला होता. १९५२ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वयाच्या १८ व्या वर्षी वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. नंतर त्यांनी ब्रिटीश नागरिकत्व घेतले आणि लंडनमध्ये राहू लागले. नुकतेच निधन झालेल्या मधु हिंदुजा यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना शानू आणि वीणू या दोन मुली आहेत. त्यांना जी.पी. हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा असे तीन भाऊ आहेत.

हिंदुजा कुटुंबाकडे १४ अब्ज डॉलर्सची संपत्ती

देशात ट्रक बनवण्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त हिंदुजा ग्रुप बँकिंग, केमिकल्स, पॉवर, मीडिया आणि आरोग्य क्षेत्राशीही संबंधित आहे. या समूहातील कंपन्यांमध्ये ऑटो कंपनी अशोक लेलँड आणि इंडसइंड सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार हिंदुआ कुटुंबातील चार भावांची एकूण संपत्ती सुमारे १४ अब्ज डॉलर इतकी आहे.

बोफोर्स घोटाळ्यात नाव आले होते पुढे

बोफोर्स घोटाळ्यात हिंदुजा बंधूंना गांधी घराण्याशी असलेल्या जवळीकीचा मोठा फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. गांधी घराण्याशी जवळीक असल्यामुळे बोफोर्स करार स्वीडिश कंपनीच्या नावे करून घेण्याचे कामही त्यांना देण्यात आले होते.

हेही वाचा;

Back to top button