पुढारी ऑनलाईन: अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. टेक्सासच्या उत्तरेकडील एका मॉलमध्ये आज (दि.७) झालेल्या गोळीबारात ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश (Shooting at Texas mall) आहे. एका संशयित आरोपीला ठार करण्यात आले असून, दुसऱ्या एका संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिली आहे.
टेक्सासमधील डॅलस-एरिया मॉलमध्ये (Shooting at Texas mall) अचानक एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रक्ताने माखलेले लोक जमिनीवर पडताना दिसतात. मारला गेलेला हल्लेखोरही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हल्ल्यात वापरलेली बंदूकही त्याच्या शरीराजवळ दिसत आहे. अशी माहिती द असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिली आहे.
यापूर्वी काल (दि.०६) अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीत अंधाधूंद गोळीबार झाला. या गोळीबारात एक जण जागीच ठार झाला होता, तर ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्टीमध्ये २०० हून अधिक लोक होते. ही घटना अमेरिकेच्या दक्षिण भागातील मेसिसिपी राज्याच्या ओशन स्प्रिंग या शहरात घडली असल्याची माहिती येथील माध्यमांनी दिली होती.