Sudan Crisis: सुदानमधून आत्तापर्यंत ६०० भारतीयांची सुटका; महाराष्ट्रातील २४६ जणांचा समावेश
पुढारी ऑनलाईन : सुदानमध्ये लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युद्धाची ठिणगी पडली. आतापर्यंत या संघर्षात ४५९ हून अधिक जण मारले गेले. तर चार हजारांहून अधिक जण जखमी झाले, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) दिली आहे. एप्रिलच्या मध्यापासूनच 'या' संघर्षाला सुरूवात झाली. त्यानंतर भारताने ऑपरेशन कावेरी या मिशनच्या माध्यमातून (Sudan Crisis) आत्तापर्यंत ६०० भारतीयांची सुटका केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २४६ जणांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली.
भारताचे परराष्ट्र सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदानमध्ये १५ एप्रिलला युद्धाला सुरूवात झाली. यावेळीपासूनच आम्ही सुदानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून होतो. आमचा अंदाज आहे की, सुदानमध्ये सुमारे 3,500 भारतीय आणि सुमारे 1000 भारतीय वंशाची व्यक्ती (PIO) आहेत. सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी (Sudan Crisis) नौदलाचे तिसरे जहाज – INS तरकश देखील आज बंदर सुदानमध्ये पोहोचले आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली आहे.
युद्धक्षेत्रात अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर काढून सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेद्दाहमधील व्यवस्थेबाबत आम्हाला सौदी सरकारकडून उत्कृष्ट सहकार्य मिळाले आहे, असे देखील परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले.
Sudan Crisis: परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यास भारत करणार मदत
आम्हाला सुदानमधून इतर देशांतील नागरिकांना देखील बाहेर काढण्याच्या विनंती करण्यात आली आहे. जो कोणी देश आमच्याशी संपर्क साधेल, त्यांना भारताकडून सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे देखील परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील या मंत्र्याची ट्वीटद्वारे मागणी
सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी जयंत पाटील यांनी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे.
हेही वाचा:
- Sudan clashes: ऑपरेशन कावेरी; सुदानमधून भारतीयांची पहिली तुकडी मायदेशी रवाना
- Sudan Clashes : सुदानमध्ये अन्न पाण्यावाचून परिस्थिती भीषण, लहान मुलांचे कुपोषण, आतापर्यंत 413 जणांचा मृत्यू; WHO ची माहिती
- Sudan Military conflict : सूदानमध्ये परिस्थिती चिघळली; 270 ठार, अनेकांचे खार्तूममधून पलायन; लैंगिक हिंसाचाराचाही अहवाल

