पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. प्रतिष्ठीत संस्था फोर्ब्जने मंगळवारी (दि.४) ३७ वी वार्षिक यादी जाहीर केली. या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती ही ८३.४ बिलीयन डॉलर आहे. यापूर्वीही अंबानी आशियतील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. सध्या ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये ९ व्या क्रमांकावर आहेत. काही महिन्यापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचया यादीत तिसऱ्या स्थानी असलेले अदानी आता २४ व्या स्थानावर आहेत. (Forbes List 2023)
फोर्ब्जने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंतांची यादी पाहता मुकेश अंबानी यांची क्रमवारी वाढली आहे हे लक्षात येईल. यापूर्वी १० व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी २०२३ मध्ये ९ व्या स्थानी आहेत. पण यावेळी त्यांच्या क्रमवारीत वाढ झाली असली तरी त्यांच्या संपत्तीत मात्र घट झाली आहे. गेल्यावेळी ते १० व्या स्थानी होते तेव्हा त्यांची संपत्ती ९०.७ बिलीयन डॉलर होती. तर २०२३ मध्ये ते जगातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानी आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि संपत्ती ८३.४ बिलियन डॉलर आहे. मुकेश अंबानी यांनी फेसबुकची मालकी असलेले मार्क झुकेरबर्ग, गुगलचे सर्गेई ब्रिन आणि ड्वेलचे मायकल डेल यांना मागे टाकले आहे.
हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकेकाळी जगातील तिसरे श्रीमंत राहिलेले गौतम अदानी आता २४ वे श्रीमंत बनले आहेत. तर भारतातील सर्वात श्रीमंत यादी पाहता ते दुसऱ्या स्थानी आहेत. तर त्यांची संपत्ती ४७.२ बिलीयन डॉलर आहे. HCL चे नादर भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपती सुमारे २५.६ बिलियन डॉलर एवढी आहे. तर जगातील श्रीमंताच्या यादीत ते ५५ व्या स्थानी आहेत.
गेल्यावर्षीची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी पाहता त्यांची सर्वांची संपत्ती २६६८ बिलीयन डॉलर एवढी होती. तर या संपत्तीचा विचार करता यंदाची संपत्ती घटली आहे. साधारणत: ती २६४० बिलीयन डॉलर आहे. या यादीतील व्यक्तींचा विचार करता सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेरिकेतील आहेत.
१. बर्नार्ड अर्नाल्ट (फ्रांस)
२. एलन मस्क (अमेरिका)
३. जेफ बेझोस (अमेरिका)
४. लॅरी एलिसन (अमेरिका)
५. वॉरेन बफे (अमेरिका)
६. बिल गेट्स (अमेरिका)
७. माइकल ब्लूमबर्ग (अमेरिका)
८. कार्लोस स्लिम हेलू (मेक्सिको)
९. मुकेश अंबानी (भारत)
१०.स्टीव बाल्मर (अमेरिका)
हेही वाचा