

Tsunami Alert Russia
नवी दिल्ली : रशियाच्या फार ईस्टमधील कामचात्का (Kamchatka) प्रदेशात अवघ्या एका तासात पाच तीव्र भूकंप झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे प्रशांत महासागरात सुनामीची शक्यता निर्माण झाली असून, रशियासाठी अधिकृतपणे सुनामी इशारा जारी करण्यात आला आहे.
अमेरिकी भूकंपशास्त्र विभाग (USGS) नुसार, हे पाचही भूकंप सुमारे 10 किलोमीटर खोलीवर झाले. सर्व भूकंप पेत्रोपावलोव्ह्स्क-कामचात्स्की (Petropavlovsk-Kamchatsky) शहराच्या पूर्वेला 130 ते 151 किमी अंतरावर केंद्रित होते.
6.6 रिश्टर स्केल (147 किमी E)
6.7 रिश्टर स्केल (151 किमी E)
7.4 रिश्टर स्केल (144 किमी E) — त्सुनामीचा इशारा जारी
6.7 रिश्टर स्केल (130 किमी E)
7.0 रिश्टर स्केल (142 किमी E)
7.4 रिश्टर स्केलचा भूकंप 0849 GMT (भारतीय वेळेनुसार सुमारे दुपारी 2 वाजता) झाला. यानंतर यूएस नॅशनल सुनामी वॉर्निंग सेंटरने रशियासाठी सुनामी इशारा जारी केला आहे. या इशाऱ्यानुसार, भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या 300 किलोमीटर परिसरात धोका संभवतो.
या तीव्र भूकंपानंतर अमेरिकेच्या हवाई राज्यासाठी देखील तात्पुरता सुनामी वॉच जारी करण्यात आला होता. मात्र, नंतर परिस्थिती स्थिर झाल्यानंतर तो रद्द करण्यात आला.
सध्या परिस्थिती नियंत्रणात
आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सुरुवातीला जर्मन रिसर्च सेंटरने (GFZ) भूकंपाची तीव्रता 6.7 म्हणून नोंदवली होती. नंतर युरोपियन मेडिटरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) आणि USGS ने तीव्रता वाढवून 7.4 अशी निश्चित केली.
कामचात्का हा भाग भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतो आणि येथे नेहमीच भूकंपाची शक्यता असते. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
भूकंपाचे धक्के बसलेला भाग जपानपासूनही जवळच आहे. जपानच्या उत्तरेकडील भागात दूरवर रशियाजवळ समुद्रात हा भाग आहे. काही दिवसांपुर्वी जपानच्या बाबा वेंगाने जपानमध्ये महात्सुनामीचे भाकीत केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता भूकंपानंतर त्सुनामी अलर्टमुळे भीतीचे वातावरण आहे.