Amritpal Singh Case : लंडन पाठोपाठ खलिस्तानी समर्थकांचा अमेरिकेतील भारतीय दुतावासावर हल्ला | पुढारी

Amritpal Singh Case : लंडन पाठोपाठ खलिस्तानी समर्थकांचा अमेरिकेतील भारतीय दुतावासावर हल्ला

सॅन फ्रॅन्सिस्को; पुढारी ऑनलाईन : लंडननंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही खलिस्तान समर्थकांनी आपले धाडस दाखवले आहे. खलिस्तान समर्थक निदर्शकांच्या एका गटाने रविवारी रात्री येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केले. ‘वारिश पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थनार्थ खलिस्तान समर्थकांकडून ही कृती करण्यात आली. यासोबतच अमृतपाल सिंगच्या साथीदारांच्या अटकेच्या निषेधार्थ इमारतीबाहेर खलिस्तानी झेंडेही फडकवण्यात आले आहेत. या घटनेवर सॅन फ्रान्सिस्को पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (Amritpal Singh Case)

मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थक आंदोलकांनी घोषणा देत तात्पुरती सुरक्षा व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि वाणिज्य दूतावासाच्या आवारात दोन तथाकथित खलिस्तानी झेंडे लावले. मात्र, हे झेंडे लवकरच वाणिज्य दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांनी हटवले. यादरम्यान संतप्त आंदोलकांनी वाणिज्य दूतावासाच्या आवारात घुसून हातात रॉड घेऊन दरवाजे आणि खिडक्यांवर हल्ला केला. (Amritpal Singh Case)

भारतीय अमेरिकन नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली (Amritpal Singh Case)

भारतीय-अमेरिकनांनी याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. भारतीय अमेरिकन समुदायाचे नेते अजय भुटोरिया यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावास इमारतीवर खलिस्तान समर्थक आंदोलकांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, हिंसाचाराची ही कृती केवळ अमेरिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांना धोका नाही तर आपल्या समुदायातील शांतता आणि सौहार्दावरही हल्ला आहे.

भुटोरिया यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्याचवेळी ते म्हणाले की, मी माझ्या समाजातील सर्व सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा :

Back to top button