Sunil Narine: 7 ओव्हर, 7 मेडन, 7 विकेट… IPL च्या ‘या’ मिस्ट्री बॉलरचा कहर | पुढारी

Sunil Narine: 7 ओव्हर, 7 मेडन, 7 विकेट... IPL च्या ‘या’ मिस्ट्री बॉलरचा कहर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या इतिहासात मिस्ट्री बॉलर म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू सुनील नरेनने (Sunil Narine) पुन्हा एकदा करिष्माई गोलंदाजी केली आहे. आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे, परंतु सुनील नरेनने आधीच तयारी सुरू केली आहे. त्याने एका सामन्यात असा कहर केला आहे की आयपीएलमध्ये त्याच्यासमोर फलंदाजी करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असेल. नरेनने एका सामन्यात 7 षटके टाकली जी सर्व मेडन ठरली. त्याने एकही धाव न देता 7 विकेट्सही घेण्याचा पराक्रम केला.

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेनवर (Sunil Narine) या हंगामातही सर्वांचे लक्ष असेल. आयपीएलचा 16 हंगाम सुरू होण्यापूर्वी नरेनने एका सामन्यात करिष्माई गोलंदाजी केली आहे. त्याने एका सामन्यात 7 षटके टाकली, जी सर्व मेडन्स ठरली आणि या दरम्यान त्याने 7 विकेट्सही मिळवण्याचा विक्रम रचला.

नरेनने (Sunil Narine) वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धेत हा पराक्रम केला. क्वीन्स पार्क क्रिकेट क्लबकडून खेळताना त्याने क्लार्क रोड युनायटेडविरुद्ध कहर केला. त्याच्या या भेदक मा-यापुढे प्रतिस्पर्धी संघाचा पहिला डाव अवघ्या 76 धावांत गारद झाला. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा स्कोर 21 होता. यानंतर क्वीन्स पार्क संघाने 3 गडी गमावून 268 धावा केल्या आणि 192 धावांची आघाडी घेतली. नरेननेसह शॉन हॅकलेटने 18 धावांत 2 बळी घेतले.

34 वर्षीय नरेनला आयपीएलचा मिस्ट्री बॉलर म्हटले जाते. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 148 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्याच्या नावावर 152 विकेट्स आहेत. नरेन आयपीएलमध्ये 7 वेळा 4 विकेट्स आणि एकदा पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत नरेनने वेस्ट इंडिजसाठी 6 कसोटी सामन्यात 21 विकेट, 65 एकदिवसीय सामन्यात 92 विकेट आणि 51 टी20 मध्ये 52 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल 2023 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.

Back to top button