इम्रान खान यांचा पाय खोलात, दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफ ( पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यासह पक्षाच्या १७ नेत्यांवर विविध गुन्ह्यांसह दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा रक्षकांवर हल्ला, तोडफोड आणि न्यायालयीन परिसरात अशांतता निर्माण केल्याचा आरोप सर्वांवर ठेवण्यात आला आहे. तोशाखान प्रकरणी अडचणीत आलेल्या इम्रान खान यांच्यावरील कारवाईचा फास आणखी आवळला गेला आहे.
बहुचर्चित तोशाखाना खटल्याच्या सुनावणीसाठी शनिवार, १८ मार्च रोजी इम्रान खान लाहोरहून इस्लामाबादला पोहोचले. यावेळी इस्लामाबाद न्यायालय परिसरात ‘पीटीआय’ कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. २५ हून अधिक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. या प्रकारानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी न्यायालयाची सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब केली होती.
इस्लामाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये सुमारे १७ पीटीआय नेत्यांची नावे आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिस चौकी आणि न्यायालयीन संकुलाच्या मुख्य गेटचे नुकसान केल्याचे ‘एफआयआर’मध्ये म्हटले आहे. न्यायालयीन संकुलाच्या इमारतीची जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोड केल्याप्रकरणीही १८ जणांना अटक करण्यात आली आहे. पीटीआयच्या समर्थकांनी दोन पोलिस वाहने आणि सात मोटारसायकली जाळल्याचा आरोप आहे.
लाहोरमधील कारवाईवेळी पोलिसांनी चालवला ‘बुलडोझर’
तोशाखाना प्रकरणात इम्रानला अटक होऊ नये यासाठी हजारो ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांनी इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर बॅरिकेड्स आणि तंबू लावले होते. पोलिसांनी शनिवारी ते हटवले. यानंतर इम्रान खान यांच्या शेकडो समर्थकांना पांगवले. या वेळी बुलडोझरचाही वापर करण्यात आला. पोलिसांनी घराचे मुख्य गेट व भिंती तोडून निवासस्थानाची झडती घेतली. या कारवाईत पेट्रोल बॉम्ब आणि अन्य शस्त्रे सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. लाहोरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १० पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.
Toshakhana Case : काय आहे प्रकरण?
२०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्ये त्या वस्तू विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात त्याची विक्री करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्यावर केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.
तोशाखाना प्रकरणी इम्रान ठरले होते अपात्र
निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.
Pakistan: Terror tag for Imran Khan’s PTI?
Watch video:https://t.co/LMAmYdQCVq
— WION (@WIONews) March 19, 2023
हेही वाचा :
- चीनकडून तैवानची पुन्हा कोंडी ! २६ लढाऊ विमाने, ४ युद्धनौकांची तैवानमध्ये घुसखोरी
- Rahul Gandhi : राहुल गांधींना नाहक त्रास देण्यासाठीच पोलिसांची कारवाई; काँग्रेसचा आरोप