Pakistan | कराची विद्यापीठात होळी खेळणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, १५ जखमी, पाकिस्तानात तीन दिवसांतील दुसरी घटना | पुढारी

Pakistan | कराची विद्यापीठात होळी खेळणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, १५ जखमी, पाकिस्तानात तीन दिवसांतील दुसरी घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील (Pakistan) कराची विद्यापीठात (University of Karachi) होळी साजरी करणार्‍या (celebrating Holi) अल्पसंख्याक हिंदू समुदायातील विद्यार्थ्यांवर कट्टरपंथी इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या काही सदस्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. कराचीमध्ये हिंदू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची ही सोमवारपासूनची पाकिस्तानातील दुसरी घटना आहे.

या घटनेबाबत कराची विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की सिंधी विभागात विद्यार्थ्यांवर हल्ल्याची घटना घडली आहे जिथे हिंदू आणि इतर विद्यार्थी एकमेकांना रंग लावत होळी साजरी करत होते. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले. “आम्ही या घटनेचा तपास करत आहे. अशा घटना आमच्या धोरणांच्या पूर्णपणे विरोधात आहेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.

एका हिंदू विद्यार्थिनीने इतर विद्यार्थ्यांसह आपला चेहरा झाकून संपूर्ण घटनेची माहिती देणारा व्हिडिओ ट्विटरवर रिलीज केला आहे. “इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी येऊन हॉलमध्ये होळी साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यांनी आमच्यापैकी काहींना मारहाण केली,” असे हिंदू विद्यार्थिनीने व्हिडिओत म्हटले आहे. “त्यांनी विद्यार्थिनींचाही छळ केला. यामुळे आम्हाला तेथून जावे लागले. होळीचा सण साजरा करण्यासाठी आम्ही जमलो होतो. सरकार आणि विद्यापीठाने या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी,” अशीही मागणी तिने केली आहे.

पंजाब विद्यापीठाच्या आवारातही आयजेटी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना होळी साजरी करण्यापासून रोखले होते. या घटनेत १५ विद्यार्थी जखमी झाले होते. पंजाब विद्यापीठाच्या कायदा महाविद्यालयात सोमवारी सुमारे ३० हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले असताना ही घटना घडली होती.

पीटीआय वृत्तसंस्थेने या घटनांच्या पार्श्वभूमीवर संपर्क साधला असता, आयजेटी (Punjab University) चे प्रवक्ते इब्राहिम शाहिद यांनी या घटनेत विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. (Pakistan)

हे ही वाचा :

Back to top button