दिनेश गुप्ता :
पुणे : जगभर थैमान घालणार्या कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त करून अनेकांना रस्त्यावर आणले. या महामारीतून बचावलेले अनेकजण अचानक किडनी निकामी होण्याच्या व्याधींनी त्रस्त आहेत. विदेशीपेक्षा भारतासारख्या उष्ण भागात काम करणार्या पुरुष व महिलांच्या किडनी निकामी होण्याचे प्रमाण मागील एक वर्षात वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार महाराष्ट्रासह बिहार व राजस्थानला 'क्रोनीक किडनी डिसीसेज ऑफ अननोन इटिओलॉजी' (सीकेडीयू) हाय रिस्क झोन म्हणून जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील उष्ण भाग असलेल्या विदर्भ, खानदेश, मराठवाडाबरोबर आता पश्चिम महाराष्ट्रातही किडनी निकामी होणार्या रुग्णांची वाढ होत असल्याचे निष्कर्ष समोर येत आहेत. आजारी पडलेल्या अनेकांच्या किडनी अचानक निकामी होऊन त्यांना डायलिसिससाठी रेफर केले जात आहेत.
कोरोनानंतर किडनी निकामी होणार्यांची संख्या वाढली आहे. देशात 14 टक्के महिला, तर 12 टक्के पुरुषांना याचा सामना करावा लागला आहे. दरवर्षी 2 ते 3 लाख किडनी रुग्ण सरकारीसह खासगी रुग्णालयात येत असून, 6 हजार रुग्णांना किडनी प्रत्यार्पण केली जात आहे. किडनीच्या आजारांना वैद्यकीय भाषेत 'सीकेडीयू' असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही भाग अतिउष्ण भाग म्हणून ओळखले जातात. यात मराठवाडा, खानदेश व विदर्भाचे उष्ण तपमान सीकेडीयूसाठी पोषक ठरत आहे. यास 'हीट स्ट्रेस नेफ्रोेपॅथी" असेही म्हटले जाते. कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला, तरी त्या रोगाने ग्रस्त झालेल्यांना किडनी रोगाने विळखा घातला आहे. कोणत्याही कारणाने आजारी पडल्यानंतर उपचारादरम्यान किडनी साथ देत नसल्याचे समोर येत आहे. परिणामी, त्या रुग्णालयात असलेल्या डायलिसिस मशीनचा वापर करून उपचार दिले जात आहे. तर दुसरीकडे ज्या रुग्णाची खर्च करण्याची ताकत नाही ते सरकारी रुग्णालयात वेटिंगवर आहेत.
महाराष्ट्रातील तीन विभाग पुढे
अभ्यासानुसार किडनी निकामी होणार्या रुग्णांची संख्या मराठवाड्यात जास्त असून, त्यापाठोपाठ विदर्भ व खान्देशचा नंबर लागतो. पश्चिम महाराष्ट्रातही या रुग्णांची संख्या वाढत असून, रुग्ण संख्या वाढू नये यावर संशोधन केले जात आहे. गेल्या 5 वर्षांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनासारख्या महामारीनंतर म्हणजे 2019 मध्ये वर्षाकाठी 100 ते 200 च्या पुढे रुग्ण येत आहेत.
काय आहेत कारणे
30-40 वयोगटातील पुरुषांची संख्या जास्त असून, पाणी कमी पिणे, साखरेचे प्रमाण अधिक असलेले पेय घेणे, ही मुख्य कारणे असली तरी रासायनिक खते, किटकनाशके, दूषित पाणीही कारणीभूत ठरत आहे.
डायलिसीसचीच वेळ…..
सीकेडीयूची खास लक्षणे नसल्याने तपासल्यानंतर लघवीत प्रोटिन व युरिक अॅसिड आढळते. सामान्यत: क्रिएटिनिनचे प्रमाण 0.7 ते 1.3 मिलीग्रॅम प्रतीडेसीलिटर असते. सीकेडीयूच्या रुग्णात ते 8-10 असते. हे रुग्ण वाढू नये यासाठी इंडियन आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीस्ट संशोधन करत आहे.
आयुष मंत्रालयाचा 'निरी केएफटी' उतारा
पीयूष मंत्रालयाने या गंभीर आजारावर पर्याय शोधला आहे. त्यांच्या अहवालानुसार 'निरी केएफटी' पुनर्रनवा, गोखरू, वरुण, पत्थरपुरा, पाषाणभेद व कमल ककडीच्या बुटीपासून तयार केलेल्या 'निरी केएफटी' चे रिझल्ट चांगले आलेले आहे. कोरोनानंतर किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढल्याने आयुर्वेद बरोबर इंडियन आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीस्ट नव्याने आणखी संशोधन केले जात आहे.
40 टक्के रुग्णांना सीकेडीयू
आरोग्य संघटनेकडून 2014-15 मध्ये किडनीचा आजार असणार्या 500 च्या वर रुग्णांचा अभ्यास केला. यात 40 टक्के रुग्णांना सीकेडीयू असल्याचे निदान झाले. यात 90 टक्के शेतकरी, शेतमजूर, 45 टक्के निरक्षर, 39 टक्के, तंबाखू, 15 टक्के मद्यसेवन करणारे, तर अनेकजण विहीर किंवा बोअरचे पाणी पिणारे असल्याचे आढळून आले. 2019 नंतर केलेल्या अभ्यासात हीच रुग्णसंख्या दुपटीपेक्षा अधिक वाढल्याचे निदर्शनास आले.
कोरोनाचा उद्रेक कमी झाला असला, तरी किडनी निकामी होऊन डायलिसिसवर जाणार्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार यावर संशोधन सुरू असून, राज्यात अशा रुग्णांसाठी सुविधा वाढवल्या जात आहेत.
– तानाजी सावंत, आरोग्यमंत्री.