Turkey earthquake: ‘आई-वडिलांनी कष्टाने उभे केलेले घर त्यांच्यावरच कोसळले’, तुर्कीच्या भूकंपातील हृदय पिळवटणा-या करुण कहाण्या….

Turkey earthquake: ‘आई-वडिलांनी कष्टाने उभे केलेले घर त्यांच्यावरच कोसळले’, तुर्कीच्या भूकंपातील हृदय पिळवटणा-या करुण कहाण्या….

अंकारा/दमिश्क, वृत्तसंस्था : तुर्कीतील भूकंपाने हजारो करुण कहाण्या जन्माला घातल्या आहेत. फरहाद अजमारिन बोलत होता… आणि ऐकताना हृदयात कंप होत होता… हृदयाचा हा कंप मोजणारे रिश्टर स्केल कुठे नाही. भावना जिवंत असतील तरच मोजता येतात…

1) तुर्कीतील फरहाद सांगत होता… आधीच माझ्या देशात सध्या बर्फवृष्टी, पाऊस रोजच चाललेला… पहाटे 4 वाजले होते आणि काच तुटल्याचा आवाज मला आला. मला वाटले, बाहेरून कुणी दगड मारला की काय! उठलो तर जमिनीवर पाय थांबत नव्हते. हा भूकंप आहे, हे लगेच कळले. मी मोठ्याने ओरडलो. कुटुंबातल्या 5 जणांना उठवले. आम्ही सगळे पळतच घराबाहेर पडलो. आई-वडील म्हातारे. आवश्यक वेग दोघांना साधता आला नाही. दोघांनी कष्टाने उभे केलेले घर त्यांच्यावरच कोसळले. दोघे गेले. पत्नी, मी आणि मुलगा रस्त्याच्या कडेला उभे राहिलो आणि दुसरा धक्का बसला. लगतची एक इमारत कोसळली. त्यात पत्नी, मुलगा दोन्ही दबले.

2) सीरियातील नागरी सुरक्षा अधिकारी तुर्कीतील एका संकेत स्थळाशी बोलला. गृहयुद्धाचे संकट आधीच असताना आलेल्या या नव्या संकटाला काय म्हणावे. ढिगारे उपसून आणि मृतदेह बाहेर काढून आम्ही थकून गेलो आहोत. ढिगार्‍यांखालून दर मिनिटाला एक तरी मृतदेह निघतोच आहे. आम्ही मोजतोच आहोत. ही गणना केव्हा संपेल माहिती नाही. अशा संकटात आपत्ती व्यवस्थापन करण्याची आमची लायकीच नाही खरे सांगायचे तर… आता जगातील अन्य देशच आम्हाला मृत्यूच्या या दाढेतून काढू शकतील. आम्ही त्यांच्याकडे दयेची भीक मागत आहोत. मृतांचा आकडा जो येतो आहे, किवा इतके मरण पावले असतील, असा जो विचार आपण करतो आहोत, त्यापेक्षा कितीतरी पटीने लोक मृत्युमुखी पडलेले आहेत… जे वाचलेले आहेत, त्यांना उपचार मिळतील कोठून… तेही मरणारच आहेत…

3) गाझियाटेपला राहणारा इरदीम आणि त्याचे कुटुंब या भल्या मोठ्या संकटातून वाचले आहे. ते घराबाहेर पडले आणि त्यांचे घर त्यांच्यादेखत कोसळले. इरदीमच्या तोंडून हे दृश्य पाहताना 'या अल्लाह' हे दोन शब्द बाहेर पडले. हा सगळा अनुभव सांगताना इरदीमचा कंठ दाटून येतो. तो म्हणतो, 40 वर्षे या कॉलनीत आम्ही राहतो आहोत. शियाद हा माझा जिगरी दोस्त. शेजारीच राहणारा… मी कुटुंबासह रस्त्यावर उभा होतो तेव्हा शियाद माझ्या मुलांना सर्व ठीक होईल म्हणून हिंमत देत होता आणि समोर एक घर कोसळले. शियाद या घरातील लोकांच्या मदतीला धावला. तो पोहोचलाच आणि घराचा उरलेला भाग त्याच्यावर कोसळला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news