पाकिस्‍तानमधील क्वेटामध्ये स्फोट, क्रिकेट सामना थांबवला | पुढारी

पाकिस्‍तानमधील क्वेटामध्ये स्फोट, क्रिकेट सामना थांबवला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील बलुचिस्‍तान प्रांतातील क्‍वेटा शहर आज ( दि. ५ ) बॉम्‍बस्‍फोटाने हादरले. या हल्‍ल्‍यात पाच जण जखमी झाले. तहरीक-ए-तालिबान पाकिस्‍तान ( टीटीपी ) या दहशतवादी संघटनेने या हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारली आहे. ( Blast in Quetta ) दरम्‍यान, पाकिस्‍तान सुपर लीगच्‍या ( पीएसएल) सामना सुरु असतानाच स्‍फोट झाल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून सामना काही काळासाठी थांबविण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Blast in Quetta : बाबर आझमसह अन्‍य खेळाडूंना सुरक्षितस्‍थळी हलवले

क्वेटामधील नवाब अकबर खान बुगती क्रिकेट स्टेडियमवर पीएसएल २०२३ मध्‍ये क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झल्मीसाठी एक प्रदर्शनी सामना खेळला जात होता. स्टेडियमपासून काही अंतरावरच स्‍फोट झाला. यानंतर खबरदारीचा उपाय म्‍हणून क्रिकेट सामना थांबविण्‍यात आला. पाकिस्‍तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज  शाहिद आफ्रिदी यांच्‍यासह अन्‍य  खेळाडूंना काही काळासाठी ड्रेसिंग रुममध्‍ये नेण्‍यात आले. पोलिसांनी सर्व पाहणीपूर्ण केल्‍यानंतर पुन्‍हा सामना सुरु झाल्‍याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. बचावकार्य पूर्ण झाले असून, घटनास्थळाची नाकाबंदी करण्यात आली. या स्‍फोटात जखमी झालेल्‍या पाच जणांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे, अशी माहिती वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍याने दिली.

‘पीएसएल’ स्‍पर्धेचे सामने हे कराची, लाहोर, मुलतान आणि रावळपिंडी येथे झाले आहेत. यंदा क्वेट्टालाही पीएसएलचा दर्जा मिळावा, यासाठी येथे सामान घेण्‍यात आला होता. मात्र या सामना सुरु असतानाच स्‍फोट झाल्‍याने एकच खळबळ उडाली.

पेशावरमधील मशिदीत झालेल्‍या स्‍फोटातील मृतांची संख्‍या 100 हून अधिक

मागील आठवड्यात पेशावरमधील मशिदीमध्ये आत्मघातकी हल्‍लेखोराने बॉम्‍बस्‍फोट घडवून आणला होता. या हल्‍ल्‍यात १०१ नागरिकांचा मृत्‍यू झाला तर २०० हून अधिक जखमी झाले होते. मागील काही दिवसांमध्‍ये दहशतवादी हल्‍ल्‍यांचा खैबर पख्तूनख्वा प्रांताला मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button