Pakistan Economic Crisis | पाकिस्तान रसातळाला! सरकारी पगारात १० टक्के कपात, मंत्र्यांची संख्याही करणार कमी | पुढारी

Pakistan Economic Crisis | पाकिस्तान रसातळाला! सरकारी पगारात १० टक्के कपात, मंत्र्यांची संख्याही करणार कमी

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : वाढत्या कर्जाचा डोंगर, महागाई आणि राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. एकूणचं पाकिस्तानची (Pakistan Economic Crisis) अवस्था श्रीलंकेसारखी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने खर्चात काटकसर करण्याचे धोरण अवलंबले आहे. पाकिस्तान आता काटकसरीच्या उपायांचा एक भाग म्हणून सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्याचा, मंत्र्यांची संख्या कमी करण्याचा आणि मंत्रालये आणि विभागांच्या खर्चावर अंकुश ठेवण्याचा विचार करत आहे. याबाबतचे वृत्त न्यूज साइट जिओ न्यूजने दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधानचे शाहबाज शरीफ यांनी स्थापन केलेली एका राष्ट्रीय समिती (National Austerity Committee) सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात १० टक्क्यांनी कपात करण्यासह अनेक उपायांवर विचार करत आहे. या प्रस्तावांमध्ये मंत्रालये आणि विभागांच्या खर्चात १५ टक्क्यांनी कपात करण्याचाही समावेश आहे. तसेच फेडरल मंत्री, राज्यमंत्री आणि सल्लागारांची संख्या ७८ वरून ३० पर्यंत कमी करण्याचे पाकिस्तान सरकारचे उद्दिष्ट असल्याचे जिओ न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून आणखी आर्थिक मागितली आहे. पण IMF ने २०१९ मधील ६ अब्ज डॉलर बेलआउट पॅकेजचा भाग असलेल्या १.१८ अब्ज डॉलर निधीचा आढावा घेण्यासाठी देशात एक टीम पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानने अनेक सुधारणा कराव्यात ज्या त्यांच्या देशाला सध्या परवडत नाही, असे IMF चे म्हणणे आहे.

गंभीर आर्थिक संकट

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अन्नपदार्थांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभर निदर्शने होत आहेत. गव्हाच्या पीठाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान पीठालाही महाग झाला आहे. पंधरा किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीच्या किमतीत नुकतीच ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. आता पंधरा किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीची किंमत २,०५० रुपयांवर (पाकिस्तानी रुपये) गेली आहे. महागाई, खंडणी, दरोड्याच्या घटना, वीज लोडशेडिंग आणि नैसर्गिक वायू केंद्रे बंद करण्याच्या विरोधात पाकिस्तानातील अनेक भागात जोरदार निदर्शने सुरु आहेत. त्यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे.

पाकिस्तानची श्रीलंकेच्या मार्गाने वाटचाल

काही दिवसांपूर्वी गव्हाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानातील बाजारपेठांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात अनेक घटना घडल्या आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट गडद होत चालले आहे. पाकिस्तानची श्रीलंकेच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. पाकिस्तानी रुपयाही झपाट्याने कमकुवत होत असल्याने, देशाच्या आर्थिक स्थितीवर याचा गंभीर परिणाम होत आहे. परकीय चलनाच्या साठ्यात झालेल्या घसरणीमुळे विनिमय दराला मोठा फटका बसला आहे. (Pakistan Economic Crisis)

 हे ही वाचा :

Back to top button