Jacinda Ardern | माझ्याकडे उर्जा राहिली नाही! न्यूझीलंडच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांची राजीनाम्याची घोषणा | पुढारी

Jacinda Ardern | माझ्याकडे उर्जा राहिली नाही! न्यूझीलंडच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांची राजीनाम्याची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील प्रभावशाली महिला म्हणून चर्चेत असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आणखी ४ वर्षे देशाचे नेतृत्व करण्यासाठी आता माझ्यामध्ये पुरेसी उर्जा राहिलेले नाही, असे सांगत त्यांनी पंतप्रधान पदावरुन पायउतार होत असल्याचे म्हटले आहे. पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. पुढील महिन्यात त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे न्यूझीलंडमध्ये पंतप्रधानपदासाठी येत्या काही दिवसांत निवडणूक होणार आहे.

आर्डर्न यांची २०१७ मध्ये पंतप्रधानपदी निवड झाली होती. त्यावेळी त्या अवघ्या ३७ वर्षाच्या होत्या. त्या जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. न्यूझीलंडमधील निवडणूक प्रचारादरम्यान त्या गर्भवती होत्या. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आठ महिन्यांतच त्यांनी बाळाला जन्म दिला होता. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आई झालेल्या त्या जगातील दुसऱ्या पंतप्रधान आहेत. याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना बेनझीर भुट्टो यांनी मुलाला जन्म दिला होता. आर्डर्न आणि त्यांचा जोडीदार क्लार्क गेफोर्ड यांची २०२९ मध्ये एंगेजमेंट झाली होती. पण कोरोना संकटामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. कोविड-१९ महामारी आणि त्यानंतर आलेली आर्थिक मंदी, ख्राइस्टचर्च मशिदीतील गोळीबाराची घटना आणि व्हाईट आयलंडमधील ज्वालामुखीचा उद्रेक अशा अनेक संकटाच्या काळात त्यांनी न्यूझीलंडचे नेतृत्व केले.

“मी माणूस आहे, राजकारणी ही माणसचं असतात. आमच्याकडून जेवढी शक्य आहे तेवढी सेवा आम्ही देशासाठी देतो आणि मग वेळ येते. आणि माझ्यासाठी, हीच वेळ आहे,” असे भावूक होत जॅसिंडा आर्डर्न यांनी म्हटले आहे. सहा वर्षे माझ्यासाठी आव्हानात्मक होती, असेही त्यांनी म्हटले आहे. “आपल्या देशाचे शांततेच्या काळात नेतृत्व करणे ही एक गोष्ट आहे, देशाला संकटातून बाहेर काढणे ही दुसरी गोष्ट आहे,” असेही त्यांनी नमूद केले आहे.

“माझ्या राजीनाम्यामागे कोणतेही रहस्य नाही. मला आशा होती की त्या कालावधीत मला जे काही आवश्यक होते ते मला मिळेल, परंतु दुर्दैवाने, मला तसे काही मिळाले नाही. तरीही मी न्यूझीलंडची सेवा करत राहणार आहे,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आर्डर्न यांनी २०२० मध्ये त्यांच्या लेबर पार्टीला मोठा विजय मिळवून दिला होता. पण ओपिनियन पोलनुसार त्यांची देशांतर्गत लोकप्रियता अलिकडच्या काही महिन्यांत घटली असल्याचे दिसून आले आहे.

१८ व्या वर्षी राजकारणात प्रवेश

जॅसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांचा जन्म २६ जुलै १९८० रोजी न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथे झाला. त्याचे वडील रॉस आर्डर्न हे एक पोलिस अधिकारी होते. आर्डर्न यांना नेहमीच राजकारणाची आवड होती. यामुळे त्यांनी २००१ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी न्यूझीलंडच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान हेलेन क्लार्क यांच्यासाठी तिने रिसर्चर म्हणून काम केले होते. २०१७ मध्ये त्या वयाच्या ३७ व्या वर्षी न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान झाल्या होच्या.

हे ही वाचा :

Back to top button