पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये सध्या पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चीनमधील स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचे ढीग लागले आहेत, तर दवाखान्यांत रुग्णांसाठी जागा अपुरी पडत आहे, असे चित्र पुढे येऊ लागले आहे. जगभरात सर्वत्र कोरोना नियंत्रणात असताना चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक का झाला, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. चीनची झीरो कोव्हिड पॉलिसी, कशा प्रकारे अपयशी ठरली, याचे उत्तर देणारा हा लेख. (Why Covid Cases Rising in China?)
चीनमध्ये राष्ट्रीय आरोग्य आयुक्तालय आहे. या आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये २०२० पासून कोरोनामुळे ५,२३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३८०४५३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या भारत आणि अमेरिकेशी तुलना करता फारच कमी आहे. चीन अधिकृत म्हणत असलेली आकडेवारी कितपत सत्य आहे, यावर शंका आहेत. कोरोना विरुद्ध लढताना चीन आणि इतर देशांनी अवलंब केलेल्या धोरणांत मोठा फरक आहे. चीनने झीरो कोव्हिड पॉलिसी स्वीकारली, त्याला सुरुवातीला बऱ्यापैकी यशही आले; पण निर्बंध शिथिल करताच चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चीनमध्ये झीरो कोव्हिड पॉलिसाला नागरिकांनी मोठा विरोध केला. अनेक नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून चीनचे सर्वोच्च नेते क्षी जीनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे चीनला निर्बंध दूर करावे लागले.
इतर देशांनी कोरोनाचा फैलाव रोखताना सर्वसामान्य जनजीवनही सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. तर चीनमध्ये मात्र झीरो कोव्हिड पॉलिसी स्वीकारण्यात आली. त्यामुळे थोडा जरी उद्रेक झाला तरी कठोर लॉकडाऊन लावणे, लक्षणं नसलेल्या रुग्णांनाही दवाखान्यात दाखल करणे, संशयित रुग्ण, त्यांच्या संपर्कातील सर्व लोकांना दीर्घकाळ विलगीकरणात ठेवणे, असे धोरण स्वीकारण्यात आले. उहादरणात शांघाय शहरात मार्च महिन्यात २ कोटी ५० लाख लोक लॉकडाऊनमध्ये होते. सुरुवातीला हे धोरण यशस्वी ठरत गेले. अशा प्रकारचे धोरण लोकशाही देशांत राबवणे शक्यच नव्हते.
सुरुवातीचे हेच यश आता चीनसाठी मोठे अपयश ठरत आहे. झीरो कोव्हिड पॉलिसीमुळे चीनमध्ये फार मोठ्या लोकसंख्येला अजून कोरोना झालेला नाही, त्यामुळे कोरोना न झालेल्या लोकसंख्येत कोरानाविरोधात रोगप्रतिकार शक्ती विकसित झालेली नाही. ओमायक्रॉन हा व्हॅरिएंट फार वेगाने पसरतो. चीनमधील झीरो कोव्हिड पॉलिसीचे कवच भेदून हा व्हॅरिएंट वेगाने पसरल्याचे मार्च-एप्रिल महिन्यात झाल्याचे दिसते. तेच आताही घडत असल्याचे दिसते. ओमायक्रॉनमुळे गंभीररीत्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी असले तरी वृद्ध व्यक्तींत तो घातक ठरू शकतो.
चीनमध्ये एकूण ३.५ अब्ज इतके डोस दिले गेले आहेत; पण ८०पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोरोना लसीचे डोस पुरेशा प्रमाणात दिलेले नाहीत. तसेच चीनने बनवलेल्या Sinovac आणि Sinopharm या लसींची परिणामकारकता किती हा प्रश्न आहे. तसेच किती नागरिकांना बुस्टर डोस दिले, याबद्दलही शंका आहे. लसीची परिणामकारकता दिवसेंदिवस कमी होत जाते. त्यामुळे बुस्टर डोस आणि नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता यांच्या अभावी कोव्हिडचा फार मोठा धोका निर्माण होतो.
हेही वाचा :