US winter storm : अमेरिका गोठली! हिमवादळामुळे ३४ मृत्यू, लाखो लोकांचा वीज पुरवठा खंडित | पुढारी

US winter storm : अमेरिका गोठली! हिमवादळामुळे ३४ मृत्यू, लाखो लोकांचा वीज पुरवठा खंडित

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन; अमेरिकेत हिमवादळाशी (US winter storm) संबंधित घटनांमधील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. अमेरिकेत हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या हिमवृष्टीमुळे लाखो लोक त्यांच्या घरात अडकून पडले आहेत. हिमवादळाचा तडाखा कॅनडाजवळील ग्रेट लेक्सपासून ते मेक्सिकोच्या सीमेवर असलेल्या रिओ ग्रांडेपर्यंत बसला आहे.  अमेरिकेतील सुमारे ६० टक्के लोकसंख्येला हिवाळ्यातील या प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला आहे. रॉकी पर्वताच्या पूर्वेपासून अ‍ॅपलाचियन्सपर्यंत तापमानात सामान्यपेक्षा खूपच घट झाली असल्याची माहिती नॅशनल वेदर सर्व्हिसने दिली आहे.

हिमवादळामुळे आधीच शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ट्रॅकिंग साइट FlightAware च्या माहितीनुसार, रविवारीपर्यंत सुमारे १,७०७ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. पश्चिम न्यूयॉर्कमधील बफेलो शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे हिमवादळामुळे जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. आपत्कालीन सेवा पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.

बफेलोमध्ये आठ फूट (२.४ मीटर) उंचीचा बर्फाचा थर साचला असून इथला वीज पुरवठा खंडित झाला आहे. “हे युद्धक्षेत्रात जाण्यासारखे आहे आणि रस्त्यांच्या कडेला उभी असलेली वाहने धक्कादायक स्थितीत आहेत,” असे न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी होचूल यांनी म्हटले आहे. रहिवासी अजूनही अत्यंत धोकादायक जीवघेण्या परिस्थितीच्या संकटात आहेत आणि त्यांना घरामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे होचूल यांनी सांगितले.

पूर्वेकडील राज्यांमधील २ लाखांहून अधिक लोकांचा रविवारचा दिवस विजेविना गेला. अनेकजणांनी सुट्ट्यांच्या बेत रद्द केला आहे. अमेरिकेतील बहुतांश राज्यांमधील तापमान गोठनबिंदूच्या खाली गेले आहे. (US winter storm)

हे ही वाचा :

Back to top button