Iran protests : हिजाबविरोधी आंदोलन : इराणमधील कोर्टाने तीन दिवसांत दोघांना सुनावली फाशीची शिक्षा | पुढारी

Iran protests : हिजाबविरोधी आंदोलन : इराणमधील कोर्टाने तीन दिवसांत दोघांना सुनावली फाशीची शिक्षा

तेहरान : पुढारी ऑनलाईन; इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनातील (Iran protests) आणखी एका आंदोलकाला इराणमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये मोठी निदर्शने झाली. महसा अमिनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने अनेकांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी याआधी रविवारी एका आंदोलकाला फाशीची सुनावली होती. इराणच्या न्यायालयाने तीन दिवसांत सुनावलेली ही दुसरी फाशीची शिक्षा आहे.

“धारदार शस्त्राचा वापर करून रस्त्यावरील लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, नागरिकांच्या मोटरसायकलना आग लावणे आणि एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असलेल्या एका आंदोलकाला फाशीची शिक्षा सुनावली आहे,” असे वत्त न्यायालयाच्या मिझान ऑनलाइन वेबसाइटने मंगळवारी उशिरा दिले आहे. याआधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एका आंदोलकांवर सरकारी इमारतीला आग लावणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवून गुन्हेगारी कट रचणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

इतर पाच जणांना राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचल्याबद्दल ५ ते १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

इराणमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब परिधान करणे बंधनकारक आहे. महिलांनी डोक्यावरील एकही केस दिसू नये, अशाप्रकारे हिजाब घालण्याची सक्ती आहे. महसा अमिनी हिने हिजाब घातला नसल्याचे कारण देत तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत असताना तिचा मृत्यू झाला होता. तिचा छळ केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप अमिनीच्या कुटुंबीयांनी केला होता. या घटनेनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले. हे आंदोलन रोखण्यासाठी आंदोलक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांत अनेकवेळा धुमश्चक्री झाली होती. हिजाबविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ४३ मुले आणि २५ महिलांसह किमान ३२६ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, असे इराण मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. (Iran protests)

हे ही वाचा :

Back to top button