

पुढारी ऑनलाईन : इराणमध्ये गेली काही दिवस सुरू असलेल्या हिजाबविरोधातील आंदोलनात आतापर्यंत ७६ जणांचा बळी गेला आहे, असा दावा इराण ह्युमन राईट्स या संस्थेने केला आहे. इराणमधील सुरक्षा दलाने या आंदोलनाविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे, यामध्ये २० पत्रकारांसह शेकडो लोकांना अटकही करण्यात आली आहे. (Iran protests: Death toll rises to 76) तर मृतांची संख्या ४२ असून यात सुरक्षा रक्षक आणि 'दंगलखोर' नागरिकांचा समावेश आहे, असा दावा सरकारी माध्यमांनी केला आहे.
आंदोलकांविरोधात स्फोटकं वापरली जात आहेत, आंदोलकांचा छळ सुरू केला जात आहे, हा आंतराष्ट्रीय गुन्हा आहे, असे इराण ह्युमन राईट्स या संस्थेने म्हटलं आहे. इराणच्या नागरिकांना त्याचे हक्क मिळाले पाहिजेत, त्यासाठी जगाने पुढे यावे, असे आवाहन या संस्थेने केले आहे. संयुक्त राष्ट संघटनेच्या मानवी हक्क आयोगानेही आंदोलकांविरोधातील हिंसक कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
महसा आमिनी या तरुणीचा १७ सप्टेंबरला कोठडीत मृत्यू झाला होता. हिजाब नीट न परिधान केल्याने इराणच्या नैतिक पोलसांनी तिला अटक केली होती. तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सर्वत्र आंदोलनाचा भडका उडाला आहे. पोलिसांच्या मारहाणीत आमिनीचा मृत्यू झाला असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. पोलिसांनी आमिनीचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला असा दावा केला होता.
हेही वाचा