G20 summit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची ‘जी- २०’ शिखर परिषदेत भेट | पुढारी

G20 summit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची ‘जी- २०’ शिखर परिषदेत भेट

बाली : पुढारी ऑनलाईन; इंडोनेशियातील बाली येथील G20 शिखर परिषदेत (G20 summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट झाली. यावेळी उभय नेत्यांमध्ये संवाद झाला. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांचीही भेट झाली. बाली येथील अपूर्वा केम्पिंस्की हॉटेलमध्ये ही परिषद होत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत हे देखील परिषदेसाठी उपस्थित राहिले आहेत.

याआधी काल सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची बाली येथे G20 शिखर परिषदेपूर्वी भेट झाली होती. बायडेन आणि शी जिनपिंग यांनी सोमवारी बाली येथील हॉटेलमधील भेटीदरम्यान एकमेकांना हस्तांदोलन केले. बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिली वैयक्तिक भेट होती. G20 शिखर परिषदेच्या दरम्यान उभय नेत्यांची भेट झाली.

ज्यो बायडेन, शी जिनपिंग, नरेंद्र मोदी यांच्यासारखे जगातील शक्तिशाली राष्ट्रप्रमुख व इतर मान्यवर ‘जी-20’ संमेलनासाठी बालीत दाखल झाले आहेत. इंडोनेशियाने संमेलनस्थळी व राष्ट्रप्रमुख उतरणार असलेल्या ठिकाणी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तब्बल 24 हजार पोलिस, लष्करी पथके, विशेष कृती दलांचे जवान आणि दहशतवादविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.

दहशतवादी कारवाया आणि हल्ले यांचा इतिहास असलेल्या मुस्लिमबहुल इंडोनेशियाने जागतिक नेत्यांच्या सुरक्षेसाठी काटेकोर खबरदारी घेतली आहे. सोमवारपासून जागतिक नेते इंडोनेशियात दाखल व्हायला सुरुवात झाली. आसियान परिषद आटोपून ज्यो बायडेन दाखल झाले आहेत. पाठोपाठ शी जिनपिंग व नरेंद्र मोदीही दाखल झाले.

असा आहे बंदोबस्त…

24 हजार तगड्या आणि लढाऊ जवानांच्या सोबतीला 13 हेलिकॉप्टर आणि फायटर जेटचा ताफा हवाई दलाने तैनात केला असून, संपूर्ण बेट आणि संमेलन होत असलेल्या रिसॉर्टवर ते घिरट्या घालणार आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी इंडोनेशियन नौदलाची 10 जहाजे किनार्‍यालगत समुद्रात तळ ठोकून असणार आहेत. याशिवाय त्सुनामी आणि भूकंप या नैसर्गिक आपत्ती इंडोनेशियात सातत्याने होत असतात, त्यामुळे अशा आपत्तींना तोंड देण्यासाठीही परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. संमेलन 15 आणि 16 तारखेला होत असले, तरी चार दिवस आधीपासूनच वाहतूक बदल, निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

संशयितांवर कडक नजर

मुस्लिमबहुल असलेल्या इंडोनेशियात ‘अल-कायदा’ व ‘इसिस’ समर्थक दहशतवादी गट अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे संमेलनात घातपात होऊ नये, यासाठी टोकाची सतर्कता बाळगण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपासून इंडोनेशियन गुप्तचर यावर काम करत असून, संशयितांवर नजर ठेवणे, काहींना ताब्यात घेणे आदी मोहिमा सतत सुरू आहेत.

कसूर करू नका : विडोडो

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या आठवड्यात जी- 20 तयारीचा आढावा घेतला. तेव्हा 20 देशांपैकी 17 देशांचे राष्ट्रप्रमुख व इतर पाहुण्या देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच सर्वच देशांतील महत्त्वाचे मंत्री, अधिकारी आणि इतर क्षेत्रांतील मान्यवर येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर केली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी लष्कर व पोलिस दलाला केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंडोनेशियातील भारतीय नागरिकांकडून जोरदार स्वागत

इंडोनेशियातील ‘जी-20’ परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने बाली येथे दाखल झाले आहेत. या दौर्‍यात आपण अनेक राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणार असून, भारताने साध्य केलेले यश यानिमित्ताने जगासमोर मांडणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. इंडोनेशियात बाली येथे मंगळवारपासून ‘जी-20’ शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सोमवारीच इंडोनेशियात पोहोचले. पाठोपाठ सोमवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी विशेष विमानाने रवाना झाले. रात्री उशिरा ते बाली येथे पोहोचले. इंडोनेशियातील भारतीय नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. (G20 summit)

हे ही वाचा :

Back to top button