

कीव्ह : रशियाच्या सैन्याने सोमवारी पहाटे युक्रनेची राजधानी कीव्हसह महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. ((Russia-Ukraine War) युक्रेनच्या लष्करी प्रमुखांनी सांगितले की, आज सकाळी झालेल्या हल्ल्यात रशियाने ७५ क्षेपणास्त्रे डागली आहेत. कीव्ह शहरावरील हल्ल्यात सुमारे ८ नागरिक आणि २४ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याने पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे कीव्ह शहराच्या महापौरांनी म्हटले आहे. आज देशभरात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.
रशियाने कीव्ह शहराच्या मध्यभागाला लक्ष्य केले. यामुळे अनेकजण मृत आणि जखमी झाल्याची माहिती आपत्कालीन सेवा प्रवक्त्यानी दिली आहे. याबाबतचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. कीव्ह शहराचा समावेश असलेल्या शेवचेन्को जिल्ह्यात मोठे स्फोट झाले आहेत. हा कीव्ह शहराच्या मध्यभागी असलेला एक मोठा भाग असून ज्यामध्ये ऐतिहासिक जुने शहर तसेच अनेक सरकारी कार्यालये आहेत, असे शहराच्या महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले.
युक्रेनच्या संसदेच्या सदस्य लेसिया वासिलेन्को यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात कीव्ह शहराच्या मध्यभागी असलेल्या कीव्ह नॅशनल युनिव्हर्सिटीच्या मुख्य इमारतीजवळ एक स्फोट झाला असल्याचे दिसून येत आहे. कीव्हमध्ये पहाटेच्या पहिल्या हल्ल्यांनंतर रशियाकडून हल्ल्याच्या तीव्रतेत सकाळनंतर आणखी वाढ झाली. रशियाच्या हल्ल्यानंतर मोठे स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, डनिप्रो शहराच्या बाहेरील भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळ अनेक लोकांचे मृतदेह आढळून आले आहेत. या परिसरातील इमारतींच्या खिडक्या उडाल्या असून रस्त्यावर काचांचा खच पडला असल्याचे वृत्त AP ने दिले आहे.
युक्रेनियन प्रसारमाध्यमांनी इतर अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती दिली आहे. पश्चिमेकडील ल्विव्ह शहर, खार्किव्ह, टेर्नोपिल, ख्मेलनीत्स्की, झिटोमीर आणि क्रोपीव्नित्स्की या ठिकाणी मोठे स्फोट झाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यात ल्विव्हमधील ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन त्यांच्या सुरक्षा परिषदेची बैठक घेणार होते, त्याच्या काही तासांपूर्वी युक्रेनवरील अनेक शहरांवर हल्ले करण्यात आले आहेत. रशिया- युक्रेन युद्ध गेल्या आठ महिन्यांपासून सुरु आहे. यामुळे संपूर्ण युक्रेन देश उद्ध्वस्त झाला आहे. (Russia-Ukraine War)
हे ही वाचा :