Russia Ukraine War Updates | रशियाचा अण्वस्त्र ताफा युक्रेनच्या दिशेने, जगभरात चिंतेचे वातावरण | पुढारी

Russia Ukraine War Updates | रशियाचा अण्वस्त्र ताफा युक्रेनच्या दिशेने, जगभरात चिंतेचे वातावरण

मॉस्को : रशिया- युक्रेन यांच्यात युद्ध (Russia Ukraine War Updates) सुरुच आहे. आता रशियाचा अण्वस्त्र ताफा युक्रेनच्या दिशेने निघाला असल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. रशियाच्या अण्वस्त्र ताफ्याची छायाचित्रे, व्हिडिओ समोर आले आहेत. पाश्चात्य देशांना इशारा देण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन एक अणवस्त्र चाचणी घेण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी ट्रकांमधून अणवस्त्र चाचणीशी संबंधित साहित्य वाहून नेले जात असल्याचे दिसून आले आहे. पुतीन यांनी गेल्या आठवड्यात अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली होती. आता प्रत्यक्षात रशियाचा अणवस्त्र ताफा युक्रेनच्या दिशेने निघाल्याने अणवस्त्र युद्धाची भिती निर्माण झाली आहे.

रशियामध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटी संरक्षण मंत्रालयाच्या १२ व्या मुख्य संचालनालयाशी संबंधित एक ट्रेन युक्रेनमधील युद्ध क्षेत्राकडे जाताना दिसून आली होती. ही ट्रेन रशियाच्या गुप्त आण्विक विभागाद्वारे चालविली जाते. टेलीग्राम चॅनेलने रयबरने मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मालगाडीवरून रशियन सैन्याचे मोठे ट्रक वाहून नेले जात असल्याचे दिसते.

पोलंडमधील संरक्षण विश्लेषक कोनराड मुज्यका यांनी सांगितले की संरक्षण मंत्रालयाच्या १२ व्या संचालनालयाने अण्वस्त्रांसाठी डझनभर केंद्रीय स्टोरेज सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ते म्हणाले, की ‘हे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या १२ व्या मुख्य संचालनालयाशी संबंधित एक किट आहे. अण्वस्त्रे सुरक्षित ठेवणे, त्यांची देखभाल, वाहतूक आणि युनिट्स सुरू ठेवण्याचे काम संचालनालयाचे आहे.’

द टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले होते की नाटोने आपल्या सदस्य देशांना एक गुप्त अहवाल पाठवला होता. ज्यातून रशिया काळ्या समुद्रात आपल्या अण्वस्त्रधारी टॉरपीडो ड्रोन पोसाइडनची चाचणी घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोसाइडन हे सर्वनाशाचे शस्त्र असल्याचे म्हटले जाते. जे पाणबुडीतून डागले जाऊ शकते.

अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचे मुख्यालय पेंटागनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जर रशियाने अणवस्त्र हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर कसे दिले जाऊ शकते यावर अमेरिका विचार करत आहे. रशियाने नुकतीच युक्रेनमधील चार क्षेत्रांचा रशियात समाविष्ट करत असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमात पुतीन यांनी रशियाच्या सुरक्षेसाठी कोणतेही पाऊल जाईल असा इशारा पाश्चात्य देशांना दिला होता. (Russia Ukraine War Updates)

हे ही वाचा :

Back to top button