Hurricane Ian | अमेरिकेतील फ्लोरिडात अत्यंत विनाशकारी इयान चक्रीवादळ धडकले, घरे, वाहने वाहून गेली, २ हजार विमान उड्डाणे रद्द | पुढारी

Hurricane Ian | अमेरिकेतील फ्लोरिडात अत्यंत विनाशकारी इयान चक्रीवादळ धडकले, घरे, वाहने वाहून गेली, २ हजार विमान उड्डाणे रद्द

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टी भागात अत्यंत विनाशकारी इयान चक्रीवादळ (Hurricane Ian) धडकले आहे. यामुळे या भागात हाहाकार उडाला आहे. अत्यंत धोकादायक असलेले हे हुर्रिकेन चक्रीवादळ फोर्ट मायर्स शहराच्या पश्चिमेला असलेल्या कायो कोस्टा बेटावर धडकले असल्याची माहिती नॅशनल हुर्रिकेन सेंटरने (NHC) दिली आहे. यामुळे फ्लोरिडाच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नैऋत्येकडील किनारपट्टी भागातील वीज पुरवठा खंडित होऊन बराचसा भाग अंधारात बुडाला होता. या चक्रीवादळाने वेगाने वारे वाहत असून अनेक ठिकाणी पाण्यातून वाहने वाहून गेली आहेत.

इयान चक्रीवादळ हे फ्लोरिडाच्या किनार्‍यावर धडकलेले अलिकडच्या काही वर्षांतील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एअरलाइन्सनी गुरुवारी सुमारे २ हजार विमान उड्डाणे रद्द केली आहेत. एअरलाइन ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटवेअरने सांगितले की, गुरुवारी १,९३५ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि शुक्रवारची ७३८ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चक्रीवादळापूर्वी मंगळवारी एअरलाइन्सनी ४०३ विमान उड्डाणे रद्द केली होती.

अमेरिकेच्या बॉर्डर पेट्रोल एजन्सीने म्हटले आहे की स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट बुडाली असून त्यातील २० स्थलांतरित बेपत्ता झाले आहेत. तिघांना तटरक्षकांनी समुद्रात बुडताना वाचवले आहे. एका टेलिव्हिजन फुटेजमध्‍ये पुराचे पाणी समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या घरांमध्‍ये शिरताना दिसले आहे. तसेच रस्ते पाण्याखाली गेले असून वाहने वाहून जात आहेत.

८० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या फोर्ट मायर्स शहरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. नॅशनल हुर्रिकेन सेंटरने सांगितले की इयान चक्रीवादळ जेव्हा जमिनीवर धडकले तेव्हा १५० मैल (२४० किलोमीटर) प्रति तासी वेगाने वारे वाहत होते. चक्रीवादळामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण झाल्याची भिती NHC ने व्यक्त केली आहे.

PowerOutage.us या ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, फ्लोरिडामध्ये एकूण ११ दशलक्षांहून अधिक लोकांच्या घरातील वीज पुरवठा बुधवारी संध्याकाळी खंडित झाला होता. इयान चक्रीवादळामुळे संपूर्ण फ्लोरिडा आणि जॉर्जिया तसेच दक्षिण कॅरोलिना या दक्षिण-पूर्व राज्यांमधील लाखो लोक प्रभावित होतील, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, फ्लोरिडा काउंटीजच्या किनारपट्टी भागातील सुमारे २५ लाख लोकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Hurricane Ian)

हे ही वाचा :

Back to top button