Iran Hijab Row : इराण राष्ट्रपतींकडून न्यूज अँकरला हिजाब घालण्याची अट, नकार दिल्याने मुलाखत थांबवली | पुढारी

Iran Hijab Row : इराण राष्ट्रपतींकडून न्यूज अँकरला हिजाब घालण्याची अट, नकार दिल्याने मुलाखत थांबवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणमध्ये हिजाब वाद आणखी वाढत चालला आहे. हजारो महिला रस्त्यावर उतरून याचा विरोध करत आहेत. (Iran Hijab Row) इराण सरकारने या आंदोलनामुळे देशात इन्स्टाग्राम आणि इंटरनेटवर प्रतिबंध घातला आहे. एका समुहाच्या हिंसक आंदोलनात ३१ लोक मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. हे प्रकरण तेव्हा चिघळले, जेव्हा इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी एका न्यूज अँकरला मुलाखत देण्यासाठी नकार दिला. कारण होतं- हिजाब. राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी न्यूज अँकरला हिजाब घालण्यास सांगितले. पण, जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा राष्ट्रपति इब्राहिम रईसी यांनी मुलाखत देण्यास नकार दिला. (Iran Hijab Row)

इराणमध्ये हिजाब वाद इतका वाढला की, अनेक ठिकाणी महिला आंदोलन करत आहेत. राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी एका चॅनेलच्या महिला पत्रकाराला न्यूयॉर्कमध्ये मुलाखत देण्यास नकार दिला. तिच्यासमोर त्यांनी अट ठेवली की, महिला पत्रकार हिजाब घालेल तरच रईसी त्यांच्याशी बोलतील. महिला पत्रकाराने ही अट मान्य केली नाही. तेव्हा राष्ट्रपती इब्राहिम रईसी मुलाखत द्यायला तयार झाले नाही.
अँकर क्रिस्टियन अमानपोर यांच्यासोबत हा प्रसंग घडला. आता या प्रकरणावरून सोशल मीडियामध्ये इराणवर टीका केली जात आहे.

अमानपोर यांची न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रपती रईसी यांच्यासोबत मुलाखत होती. मागील एक आठवड्यापासून इराणमध्ये हिजाबवरून सुरू असलेल्या वादावर ती चर्चा करणार होती. मुलाखतीची तयारी देखील सुरू झाली होती. परंतु, यादरम्यान राष्ट्रपतींच्या सहाय्यकाने त्यांना सांगितलं की, तिने जर हिजाब घातला तर मुलाखत होऊ शकेल. ही अट अमानपोर यांना मान्य नव्हती. त्या म्हणाल्या-ती न्यूयॉर्कमध्ये आहे. येथे या प्रकारचे नियम-परंपरा लागू होऊ शकत नाहीत. अखेर राष्ट्रपती मुलाखतीसाठी आले नाही. यानंतर अमानपोर यांनी या घटनेवरून ट्विट केलं. त्यांनी आपल्या समोर राष्ट्रपतींसाठी ठेवण्यात आलेल्या रिकाम्या खुर्चीचा फोटोदेखील शेअर केला आहे.

Back to top button