पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या भव्य सोहळ्याला सुरूवात झाली. या सणाच्या पार्श्वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने पुन्हा एकदा चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम पुन्हा सुरूच ठेवली आहे. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, एका अंदाजानुसार देशात दरवर्षी 20 कोटींहून अधिक गणेशमूर्ती खरेदी केल्या जातात. यातून अंदाजे 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होते. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून देशभरात मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसवण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे.
या आधी प्लास्टर ऑफ पॅरिस, दगड, संगमरवरी आणि इतर वस्तूंपासून बनवलेल्या गणेशमूर्ती स्वस्त दरात चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात केल्या जात होत्या, परंतु गेल्या दोन वर्षांत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेमुळे चिनी गणेश मूर्तींची आयात बंद झाली आहे. यामुळे देशातील कुंभारांकडे मुर्तींची मागणी वाढली.
कुंभार आपल्या घरीच गणेश मूर्ती बनवतात. यामध्ये कुटुंबातील महिलांचा समावेशाचे प्रमाण अधिक असतो. माती आणि शेणाचा वापर करून मूर्ती बनवली जाते. पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्या जात आहे, त्यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही.