हत्तींची ‘शाही’ निवृत्ती | पुढारी

हत्तींची ‘शाही’ निवृत्ती

चेन्‍नई : श्‍वानपथकातील श्‍वानांपासून ते सुरुंग शोधणार्‍या एका उंदरापर्यंत अनेक प्राण्यांनी मानव समाजासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. अशा प्राण्यांना मोठ्या सन्मानाने सेवेतून निवृत्तही केले जाते. आता दोन हत्तींनाही असे निवृत्त करण्यात आले व त्यांना सेवेच्या शेवटच्या दिवशी ‘राजा’ बनवण्यात आले!

तामिळनाडूच्या मुदुमलाई टायगर रिझर्व्ह विभागातील हे दोन हत्ती आहेत. ते कुमकी अभियानात महत्त्वाची भूमिका बजावत होते. या अभियानातून आता ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा इथंपर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. त्यांना निरोप देताना वन विभागातील लोकही भावूक झाले होते. या दोन्ही हत्तींचे वय 58 वर्षांपेक्षा अधिक आहे. यापैकी एका हत्तीने वीस माणसांवर हल्‍ला केल्याचा ठपका सुरुवातीला होता.

दुसर्‍या हत्तीवरही असाच ठपका होता. मूर्ती आणि मुदुमलाई नावाचे हे हत्ती कॅम्पमध्ये आल्यावर एकदम बदलून गेले. त्यांचा वापर पुढे वन विभागाकडून हल्‍ला करणार्‍या जंगली हत्तींचा शोध घेण्यासाठी होऊ लागला. या कुमकी अभियानात त्यांनी अनेक वर्षे महत्त्वाची भूमिका बजावली. मुदुमलाई नावाच्या या हत्तीला तो तीन वर्षांचा असताना एका खड्ड्यातून वाचवण्यात आले होते. आता या दोन्ही हत्तींना एखाद्या राजासारखा निरोप देण्यात आला.

Back to top button