सोव्हियत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन | पुढारी

सोव्हियत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

पुढारी डेस्क : सोव्हियत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ वर्षी निधन झाले आहे. त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. रशियाच्या सेंट्रल क्लिनिकल रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे एका गंभीर आणि दीर्घ आजाराने निधन झाले.” रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.

शीतयुद्धाचा शांततापूर्ण शेवट करण्यात गोर्बाचेव्ह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. गोर्बाचेव्ह यांनी १९८५ मध्ये सत्ता हाती घेतली होती. रक्तपात न करता त्यांनी शीतयुद्धाचा शेवट केला होता. पण पण सोव्हिएत युनियनचे पतन रोखण्यात त्यांना अपयश आले होते.

जेव्हा १९८९ मध्ये पूर्व युरोपातील सोव्हिएत राष्ट्रांमध्ये लोकशाही समर्थकांची निदर्शने सुरु होती तेव्हा त्यांनी बळाचा वापर करणे टाळले. पण वाढत्या निदर्शनांमुळे सोव्हिएत युनियनमधील १५ प्रजासत्ताक राष्ट्रांमध्ये स्वायत्ततेच्या आकांक्षांना चालना मिळाली. यामुळे पुढील दोन वर्षांत सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. या विघटनाआधी गोर्बाचेव्ह हे सोव्हियत युनियनचे राष्ट्राध्यक्ष होते. सोव्हिएत युनियनच्या विघटन घोषणेच्या एक दिवस आधीच ते पदावरुन पायउतार झाले.

शीतयुद्धाच्या वेळी रशिया आणि पाश्चिमात्य देश एकमेकांसमोर उभे ठाकून तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी शांततेचा मार्ग अवलंबत शीतयुद्धाचा शेवट केला. त्यासाठी त्यांना १९९० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाचा :

Back to top button